आयपीएल सुरळीत करून चाहत्यांची विश्वासार्हता मिळवण्यासाठी संचालन समितीने स्थापन केलेल्या कार्यगटातील सदस्यांची नावे सोमवारी जाहीर करण्यात आली. बीसीसीआयच्या या कार्यगटात पाच जणांचा समावेश असून आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर, खजिनदार अनिरुद्ध चौधरी, कायदे सल्लागार यूएन बॅनर्जी यांच्यासह माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीचा देखील समावेश करण्यात आला आहे.
हा कार्यगट आयपीएल फिक्सिंग संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीने दिलेल्या निकालाचा अभ्यास करणार असून शिफारस करण्यासाठी सहा आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या निर्णयाने आयपीएलला जोरदार धक्का बसला होता. यामधून सावरण्यासाठी आयपीएलच्या संचालन समितीने पहिले पाऊल उचलले आहे.

