एकतर्फी प्रेमातून तरुणीला पेटविले

एकतर्फी प्रेमातून तरुणीला तिच्या राहत्या घरासमोर निर्घृणपणे जाळल्याप्रकरणी पेालिसांनी दोन जणांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (२५ मार्च) घडली होती. पेटविल्यामुळे गंभीर भाजलेल्या तरुणीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी (२८ मार्च) सकाळी मृत्यू झाला.

अश्विनी किसन कांबळे (वय २०, रा. कोरेगाव, ता. कर्जत) असे मरण पावलेल्या तरुणीचे नाव आहे. शैलेश बारकू अडसुळ व किशोर छगन अडसुळ अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील शैलेश अडसुळ याचे अश्विनीवर एकतर्फी प्रेम होते; मात्र, ती त्याला फारसा प्रतिसाद देत नव्हती. एक वर्षापूर्वी अश्विनीच्या आईने, ‘शैलेश हा आपल्या मुलीस फोन करून किंवा रस्त्याने जात असताना त्रास देतो,’ अशी तक्रार दिली होती.

या तक्रारीनंतर शैलेशने काही दिवस त्रास दिला नाही; मात्र, त्यानंतर रविवारी (२५ मार्च) दुपारी तीनच्या सुमारास अश्विनी आपल्या राहत्या घरासमोर उभी होती. त्या वेळी घरात इतर कोणीही नसल्याचे पाहून शैलेश अडसुळ व किशोर अडसुळ तेथे आले व त्यांनी अश्विनीला पेटवून दिले आणि ते पळून गेले. गंभीर भाजलेल्या अश्विनीला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी (२८ मार्च) सकाळी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. यानंतर तिचा मृतदेह कोरेगाव येथे आणण्यात आला होता; मात्र, आरोपींना अटक होईपर्यंत अश्विनीवर अंत्यसंस्कार करावयाचे नाहीत, असा पवित्रा तिच्या नातेवाइकांनी घेतला होता. पोलिसांनी शैलेश व किशोर अडसुळ या दोघांवर गुन्हा दाखल करून दोघांना सायंकाळी अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *