मुंबई – २००२ मधील हिट अँड रन प्रकरणातील दोषी ठरल्यानंतर सध्या जामिनावर बाहेर असलेला अभिनेता सलमान खानने दुबईला जाण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे.
सहा मे रोजी हिट अँड रन खटल्यात सलमानला सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यासाठी त्याला पाच वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
त्यानंतर आठ मे रोजी उच्च न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर करत त्याच्या शिक्षेला स्थगिती दिली. तसेच ज्या ज्या वेळी सलमानला देशाबाहेर जायचे असल्यास त्याला न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानुसार सलमानने पुढील महिन्यात दुबईमध्ये होणा-या शोसाठी जाण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली आहे. पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.