शेतच जळाले, आता मुलीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडणार; शेतकऱ्यापुढे विवंचना

खरीप हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी आधीच हैराण आहेत. फेब्रुवारी महिन्यात गारपिटीने शेतकऱ्यांचे रब्बी हरभऱ्याचे पीक होत्याचे नव्हते केले. आता उरलेल्या शेतातील उसाच्या उत्पन्नातून तरी मुलीच्या लग्नासाठी कर्ज फेडता येईल या विचारात असतानाच गंगाधर मारोती दंडेवाड यांच्यावर आणखी एक संकट कोसळले. त्यांच्या शेतातील ३ एकरांच्या उसाच्या फडात आग लागली आणि होत्याचे नव्हते झाले. महावितरण कंपनीच्या लोंबकळणाऱ्या विद्दुत तारांच्या झालेल्या घर्षणातून फुलंग्या पडल्यामुळे ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आणि दंडेवाड अक्षरश: हतबल झाले.

दंडेवाड यांचे बंधू सकाळी शेतात आल्यावर त्यांना शेतात धूर दिसला. त्यांनी तातडीने आजुबाजूच्या लोकांना सांगून विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग मोठी असल्याने ती आटोक्यात येण्यास बराच वेळ लागला. वाऱ्याचा जोर जास्त असल्याने एकीकडे आग विझविली तरी दुसरीकडे ती पेटतच होती. अशात संपूर्ण शेत जळून खाक झाले आणि आता मुलीच्या लग्नासाठी आणि शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडायेच कसे असा प्रश्न दंडेवाड यांच्यापुढे उभा आहे. हिमायतनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर त्यांचे शेत असून जवळपास ५ लाखांहून अधिक रकमेचे कर्ज त्यांनी घेतले होते. याबाबत दंडेवाड यांनी संबंधित विभागांना अर्ज देऊन भरपाई देण्याची मागणी केली आहे. तहसीलदार, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता कार्यालयास हे निवेदन दिल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *