व्हीआयपी मोबाईल क्रमांकाची हौस माजी मंत्री बबनराव घोलप यांना चांगलीच महागात पडली आहे. व्हीआयपी मोबाईल क्रमांकाचे आमिष दाखवत बबनराव घोलप यांना भामट्यांनी १ लाख ३३ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात महिन्यांपूर्वी बबनराव घोलप यांना एक फोन आला होता. फोनवरील व्यक्तीने एका प्रसिद्ध टेलिकॉम कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवत व्हीआयपी नंबर मिळवून देऊ, असे सांगितले. व्हीआयपी मोबाईल क्रमांकासोबतच अॅपल कंपनीचा आयफोन देऊ, असे घोलप यांना सांगण्यात आले. फोनवरील व्यक्तीने घोलप यांच्याकडून टप्प्याटप्प्यात पैसे उकळले. त्याने घोलप यांच्याकडून एकूण १ लाख ३३ हजार रुपये उकळले. मात्र, पैसे देऊनही व्हीआयपी मोबाईल क्रमांक आणि आयफोन मिळत नसल्याने घोलप यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. शेवटी त्यांनी या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.
