महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लंडन दौऱ्यादरम्यान सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे. शिंदे यांच्या उल्लेखनीय कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल घेत त्यांचा लंडनमध्ये सन्मान केला जाणार आहे. यासाठी शिंदे मंगळवारी रात्री लंडनला रवाना झाले. मात्र शिंदेसोबत गेलेले अधिकारी वेगळ्या विमानाने प्रवास करत होते. हे विमान ज्या विमानतळावर लँड करणार होते तिथेच सायबर हल्ल्याच्या शक्यतेमुळे अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे शिंदेंच्या चमूला घेऊन जाणाऱ्या विमानाला तिथे लँड करता आलेलं नाही.
ब्रिटिश संसदेच्या ‘हाऊस ऑफ लॉर्डस्’मध्ये शिंदे यांचा ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ या पुरस्कारासोबतच ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह 2026’ मध्ये त्यांना ‘स्टेटस्मनशिप अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आज म्हणजेच 9 सप्टेंबर आणि उद्या 10 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी शिंदे रात्री मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळावरुन रवाना झाले. त्यांच्यासोबतच्या टीममधील सदस्य अन्य विमानाने रवाना झाले. हे सदस्य असलेलं विमान लंडनमधील ज्या हिथ्रो एयरपोर्टवर उतरणार होते तिथे सायबर हल्ला झाल्याच्या संशयातून फ्लाईट डायव्हर्ट करण्यात आल्या. म्हणजेच या विमानतळावर विमानं उतरवण्यास मज्जाव करण्यात आला असून जवळपास 1200 विमानांना अन्य विमानतळांवर उतरण्यास सांगण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी आणि फोटोग्राफर यांची फ्लाईट डायव्हर्ट करण्यात आली आहे.
कुठे उतरलं हे विमान? पुढे काय?
हिथ्रोऐवजी हे विमान स्वित्झर्लंड झ्युरीकला उतरवण्यात आलेलं आहे. विमान आज लंडनमध्ये जाण्यापूर्वी या चमूला दोन तास वाट पहावी लागली. पहाटे पाच ते सात हे चमू वाट पाहत होता. त्यांना सात वाजता यांची लंडनला नेण्यात आलं. अचानक झालेल्या सायबर हल्ल्यामुळे मुंबईतून पुरस्कारासाठी गेलेल्या उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना याचा फटका बसला आहे. सहा अधिकारी झ्युरिकला अडकले आहेत. हा सारा प्रकार घडला तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या ब्रिटिश एयरवेजचा विमानात होते. त्यांची फ्लाईट वेळेत असल्याची माहिती देण्यात आली.
सन्मान कशासाठी आणि स्वरुप काय?
यूके एशियन बिझनेस कौन्सिल आणि ‘कॅनव्हास फॉर केअर क्रिएटिव्ह आर्ट कॅम्पस’ यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, 9 सप्टेंबर रोजी हाऊस ऑफ लॉर्ड्स येथे ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ सोहळा पार पडणार आहे. उत्तर आयर्लंडच्या माजी फर्स्ट मिनिस्टर द राइट ऑनरेबल बॅरोनेस आर्लेन फॉस्टर आणि यूके एशियन बिझनेस कौन्सिलचे चेअरमन अँड्र्यू ग्रोकॉक यांच्या वतीने कौन्सिलचे उपाध्यक्ष सुदीप सकाळे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना निमंत्रण पाठवले आहे. शिंदे मुख्यमंत्रीपदी असताना आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून राबवलेल्या नागरिक-केंद्री, पारदर्शक आणि नाविन्यपूर्ण प्रशासन पद्धतीसाठी हा बहुमान दिला जाणार असल्याचे निमंत्रकांनी म्हटले आहे.
या सन्मानासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यकाळातील तीन प्रमुख कल्याणकारी योजनांची विशेष दखल घेतली असून यामध्ये महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठीची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, नागरिकांना शासकीय सेवा थेट घरापर्यंत पोहोचवणारा ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम आणि तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव व रोजगार मिळवून देणारी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. हा सन्मान पूर्णपणे प्रशासकीय कार्यक्षमता, महिला सक्षमीकरण आणि थेट लाभ हस्तांतरण यांवर आधारित असल्याचे ‘युकेएबीसी’ने स्पष्ट केले आहे. याशिवाय, या सोहळ्यादरम्यान ‘कॅनव्हास फॉर केअर’ या संसदीय कला प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले असून, यात ब्रिटनमधील मुलांनी महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण योजना’ आणि ‘शासन आपल्या दारी’ या योजनांच्या संकल्पनेवर रेखाटलेली चित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत.
महाराष्ट्र मंडळाकडूनही सन्मान
या लंडन दौऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदे हे महाराष्ट्र मंडळाच्या महाराष्ट्र भवनालाही भेट देणार आहेत. या महाराष्ट्र मंडळास 94 वर्षांचा इतिहास आहे. याप्रसंगी, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’नेसह उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल शिंदे यांचा ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ या सन्मानाने गौरव करण्यात येणार आहे.
