मुंबईजवळील शहरात सीएकडून मोठं कांड; तब्बल ५०० कोटी विदेशात, बनावट कंपन्यांतून कसा केला घोटाळा?

कंपन्यांचे तब्बल ४९५ कोटी ३० लाख रुपये भारतामधून विदेशात बेकायदा वर्ग केल्याप्रकरणी भाईंदरमधील एका चार्टर्ड अकाऊंटंटविरोधात (सीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर चुकीच्या माहितीच्या आधारे प्रमाणपत्रे देऊन बनावट खासगी कंपन्यांच्या माध्यमातून ही रक्कम विदेशात पाठवल्याचा आरोप आहे. प्राप्तिकर विभागाच्या तपासातून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर भाईंदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भारतातून विदेशात जाणाऱ्या, तसेच विदेशातून भारतात येणाऱ्या आर्थिक व्यवहारांची प्राप्तिकर विभागाकडून तपासणी केली जात आहे. यादरम्यान भाईंदर पश्चिमेतील विनायक रोड येथे कार्यालय असलेला सीए महेंद्र पुरोहित याने विदेशात पैसे पाठवण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र चुकीच्या माहितीच्या आधारे जारी केल्याचे निदर्शनास आले.

प्राप्तिकर नियमांनुसार पाच लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम विदेशात पाठवण्यासाठी सीएचे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे या प्रकरणाचा सविस्तर तपास प्राप्तिकर विभागाकडून सुरू करण्यात आला. यात सीएच्या शिक्क्याने ५०० कोटी विदेशात विविध नावांनी नोंदवलेल्या खासगी कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल ४९५ कोटी ३० लाख रुपये बेकायदा पद्धतीने विदेशात वर्ग केल्याचे आढळून आल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश कंपन्या बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. सन २०२२-२३ ते २०२५-२६ या चार वर्षांत ही आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी सहायक कर अधिकारी सच्चिदानंद चौरसिया यांनी भाईंदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून पुरोहितविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

या आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात घेऊन भाईंदर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. यासंदर्भात प्राथमिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले. हा निधी नेमका कोणत्या कारणासाठी विदेशात पाठवण्यात आला, संबंधित कंपन्यांना हा पैसा कसा प्राप्त झाला, आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *