गणेशोत्सव जवळ आलेला असताना डीजेबंदीचा मुद्दा गाजत आहे. अशातच आता नवरात्रीत होणाऱ्या गरब्यावरूनही टीका-टिपण्णी सुरू झाली आहे. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात मुस्लिम समाजातील व्यक्तींना प्रवेश नसावा, अशी मागणी केलेली असताना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र काहीशी वेगळी भूमिका मांडली आहे. एखादा व्यक्ती गरब्यात येत असेल आणि नीट आनंद घेऊन जात असेल तर त्यात काही गैर नाही, अशी भूमिका अमृता फडणवीस यांनी मांडली आहे.
चंद्रपूर इथं पत्रकारांना अमृता फडणवीस यांना नितेश राणे यांनी गरब्याबाबत मांडलेल्या भूमिकेवर प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की, “मला वाटतं, आपला उत्सव सर्वांचा समावेश करणारा आहे. माझा विचार असा आहे की, एखादी मुस्लिम व्यक्ती गरब्यात येत असेल आणि नीट आनंद घेऊन जात असेल, तर त्यात काही खराब वाटत नाही,” असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
नितेश राणे नक्की काय म्हणाले होते?
नितेश राणे हे मागील काही वर्षांपासून आक्रमक हिंदुत्ववादी भूमिका घेत असून मुस्लिम समाजाविषयी त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भूमिका मांडताना नितेश राणे म्हणाले की, “गरब्यामध्ये जाताना मुस्लिम तरुण हे हिंदू नाव सांगतात, कपाळावर टीळा लावतात व हिंदू मुलींना फसवतात. आमच्या भगिनींना लग्नानंतर हे सगळं कळतं. त्यामुळे, हिंदू तरुणींना सुरक्षित ठेवण्यासाठी गरब्यामध्ये मुस्लिमांना प्रवेश द्यायला नको, अशी मागणी करण्यात आली आहे,” असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं.
डीजेवरून होणाऱ्या वादावर काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
गणेशोत्सवादारम्यान डीजेच्या वापरावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असून या मुद्द्यावरून भाजपमध्येही दोन गट पडले आहेत. राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये डीजेवर निर्बंध आणले गेले असताना काही नेत्यांकडून डीजेच्या समर्थनार्थ भूमिका मांडली जात आहे. याबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या की, “सुप्रीम कोर्टाने सण-उत्सवांमध्ये काही डेसिबलचा आवाज मान्य केला असून याबाबत कोर्टाने जे निर्देश दिले गेले आहेत त्याचं पालन केलं गेलं पाहिजे. डीजेमुळे आसपासच्या लोकांना त्रास नको व्हायला,” असं त्यांनी म्हटलं आहे.
