FDAचा धडाका! IRCTC, इस्कॉनशी संबंधित कँटिनवर कारवाईची तलवार, भेसळीवरही स्ट्राईक; कोणाचे परवाने निलंबित?

‘ आयआरसीटीसी ’ अंतर्गत रेल्वेप्रवाशांना अन्नपुरवठा करणाऱ्या बेस किचन आणि फूड प्लाझाची अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तपासणी केली. त्याअंतर्गत पाच आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, ‘ इस्कॉन ’च्या तीन केंद्रांचेही परवाने निलंबित केले आहेत. कुर्ला येथील आर. के. असोसिएट, ओम साईराम एंटरप्रायजेस, अंबुज हॉटेल्स एक्स्प्रेस फूड सर्व्हिस, मे. आरहा हॉस्पिटॅलिटी या बेस किचन आणि फूड प्लाझांवर कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी झुरळांचा प्रादुर्भाव, उघड्यावर असणारे अन्न, अस्वच्छ स्वयंपाकघर, तुटलेल्या फरशा, भिंतींना तडे निदर्शनास आले.

इस्कॉनच्या तीन केंद्रांवर कारवाई

जुहू येथील ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शिअसनेस’च्या (इस्कॉन) तीन केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. या तिन्ही केंद्रांमध्ये अन्नसुरक्षा, स्वच्छता, कच्च्या मालाची गुणवत्ता, कीटकनियंत्रण, कर्मचारी स्वच्छता, प्रशिक्षण, प्रयोगशाळा तपासणी या बाबींबाबत गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे या केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्नसुरक्षा निकषांचे पालन न केल्याबद्दल मुंबईतील सहा आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्यात मालाड येथील झेप्टो, बोरिवली पूर्वेकडील श्री मधुरम, मुलुंड पश्चिमेकडील कोठारी स्वीट्‌स, मुलुंड फरसाण मार्ट यांचा समावेश आहे. गोरेगाव पूर्वेकडील महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचा परवानाही तपासणीदरम्यान निलंबित करण्यात आला. मालाड येथील झेप्टो येथेही प्रादुर्भाव, शीतसाखळीचा भंग, अस्वच्छता, स्वच्छतेसंदर्भात अपुरी व्यवस्था, कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता व सुरक्षिततेच्या निकषांचे पालन न होणे अशा विविध कारणांमुळे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

उर्वरित ठिकाणी आवश्यक सुधारात्मक उपाययोजना

दरम्यान, निर्धारित मानकांनुसार कुर्ला बेस किचनमध्ये आवश्यक सुधारात्मक उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या किचनचे कामकाज आज, बुधवारपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, उर्वरित ठिकाणी आवश्यक सुधारात्मक उपाययोजनांचे काम सध्या सुरू आहे, असे ‘आयआरसीटीसी’ने स्पष्ट केले आहे.

खारघरमधील ‘मातेश्वरी मिल्क’वर कारवाई

खारघरमधील मातेश्वरी मिल्क सेंटरवर दूध साठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता, कीटक नियंत्रण, कर्मचारी वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक नोंदींमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या. दुधाच्या प्रकाराबाबत ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता आणि पाश्चरायझेशन सुविधेशिवाय पाश्चराइज्ड दुधाचा पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे.

‘झेप्टो’ आणि प्रसिद्ध हॉटेल्सवर बंदीची कुऱ्हाड

अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएने काही आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये मालाड पश्चिमेतील झेप्टो स्टोअर असलेले ड्रोघेरिया सेलर्स, मुलुंडमधील कोठारी स्वीट्स, मुलुंड फरसाण मार्ट आणि महाराष्ट्र बिर्याणी सेंटरचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. बॉम्बे द फूड फ्युजन कॅफे (घाटकोपर) आणि श्री मधुरम (बोरिवली पूर्व) यांच्यावरही एफडीएने कारवाईचा बडगा उगारला आहे.

नवी मुंबईतही कारवाई

खारघर येथील ‘मातेश्वरी मिल्क’मध्ये अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना गंभीर अनियमितता आढळून आल्या. पाश्चरायझेशनची कोणतीही सुविधा नसताना ‘पाश्चराइज्ड दूध’ म्हणून विक्री करणे आणि सुट्या दुधाबाबत ग्राहकांची फसवणूक करणे, असे प्रकार समोर आले. सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करता एफडीएने या डेअरीचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *