पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या एकूण जमिनीपैकी सुमारे 75 टक्के जमीन जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आली आहे. सुमारे 850 हेक्टर जमीन जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आली असून याचा मोबदलाही देण्यात आला आहे. या जमिनीच्या बदल्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 3600 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे.
प्रति एकर 1.61 कोटी भाव
सात गावांतील सुमारे तीन हजार एकर जमीन पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित केली जात आहे. प्रति एकर किमान 1.61 कोटी रुपये इतका मोबदला निश्चित करण्यात आला असून घर, फळबागा, बोअरवेल इत्यादींसह सरासरी दोन कोटी रुपये प्रति एकर मिळत आहेत. एकूण अपेक्षित खर्च सुमारे सहा हजार कोटी रुपये इतका आहे. मे-जून 2026 पर्यंत सुमारे 900 ते 1150 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा झाले होते. आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम 3600 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
कोणत्या गावांमधील जमीन घेतली जात आहे?
छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ हा पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात प्रस्तावित ग्रीनफिल्ड प्रकल्प आहे. हा पुण्याच्या विद्यमान लोहगाव विमानतळावरील दाब कमी करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय व कार्गो वाहतुकीसाठी उभारला जात आहे. यासाठी सात गावांमध्ये सुमारे 1216 हेक्टर (सुमारे तीन हजार एकर) जमीन संपादित केली जात आहे. वनपुरी, कुंभारवळण, उदाचीवाडी, एखतपूर, पारगाव, मुंजवडी आणि खानवडी गावातील जमीन संपादित केली जाणार आहे. याच गावातील शेतकऱ्यांच्या खात्यांवर आता 3600 कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत.
त्या शेतकऱ्यांना अतिरिक्त 10 टक्क्याचा लाभ नाही
भूसंपादनाच्या स्थितीसंदर्भात बोलायचं झालं तर सुमारे 94 ते 96 टक्के शेतकऱ्यांनी जमीन संपादनासाठी संमती दिली आहे. उर्वरित सुमारे 40 हेक्टर जमीन आता सक्तीने संपादित केली जाणार आहे. यासाठी 31 ऑगस्ट 2026 नंतर मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सक्तीने संपादित झालेल्या शेतकऱ्यांना 10 टक्के विकसित भूखंड मिळणार नाही. संमती देणाऱ्यांना संपादित जमिनीच्या 10 टक्के विकसित भूखंड एरोसिटीत परतावा म्हणून मिळणार आहे.
प्रत्यक्ष बांधकाम कधी सुरु होणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2026 पासून प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) लवकरच निविदा काढणार आहे. डीपीआर सप्टेंबर 2026 पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पामध्ये दोन समांतर धावपट्ट्या आणि मोठे कार्गो टर्मिनल प्रस्तावित आहेत. या विमानतळाला पुण्याशी जोडण्यासाठी मेट्रो-रोड टनेलचाही विचार सुरू आहे.
