आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी ‘मेसेज’;चा गोंधळ,कोकणकर हैराण

कोकणवासीयांच्या रोजच्या प्रवासाचा आधार ठरणारी मुंबई-सावंतवाडी रोड एक्स्प्रेसच्या प्रवासाचे शुक्लकाष्ठ कायम आहे. नव्या गाडीच्या आरक्षणाचा पहिला दिवस गोंधळाचा ठरला. आरक्षण सुरू झाल्यानंतर काही वेळात गाडीचे आरक्षण पूर्ण झाले.

गोंधळच गोंधळ

पुढील दिवसांसाठी आरक्षण होत नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली. विशेष म्हणजे सकाळीच ‘ट्रेन रद्द’ हा झळकणारा संदेश नंतर ‘आरक्षण तात्पुरते थांबवण्यात आल्या’मध्ये रुपांतरित झाला. यामुळे कोकणवासीयांच्या गोंधळात अधिकच भर पडली. आज, बुधवारपासून आरक्षण सुरू होणार आहे, असा मध्य रेल्वेचा दावा आहे.

मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेस

पुढील सोमवारी, १४ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे. महामुंबई परिसरातून कोकणात जाण्यासाठी चालवण्यात आलेल्या नियमितसह विशेष रेल्वेगाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. केवळ मुंबईच नव्हे तर पुणे, नांदेड, अहमदाबाद येथून ही कोकणासाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहे. सणासुदीच्या धर्तीवरच मुंबई-सावंतवाडी रोड नियमित एक्स्प्रेसला मंजूरी दिली आहे.

आरक्षण पूर्ण

मुंबई-सावंतवाडी एक्स्प्रेस रात्री ११.५० वाजता सुटणार असल्याने नोकरदारवर्गांसाठी ही वेळ सोईची आहे. रात्रीचा प्रवास सोईचा असल्याने अनेकांनी गाडीसाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर अक्षरक्ष: उड्या घेतल्या. यामुळे सकाळीच आरक्षण पूर्ण झाले.

‘मेसेज’ने केला डोक्याला ताप

दरम्यान ही गाडी नियमित असल्याने अनेकांनी ९, १०, ११, १२ सप्टेंबर अशा तारखांसाठीचे आरक्षण करण्याचा प्रयत्न केला. मात्र या तारखेच्या प्रवासासाठी ‘ट्रेन कॅन्सल्ड’ असा संदेश संकेतस्थळावर दिसला. विशेष म्हणजे दुपारनंतर ट्रेन कॅन्सल्ड ऐवजी सस्पेंडेड असा मेसेज झळकला.

आरक्षण करायचे तरी कसे

यामुळे आरक्षण कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला. प्रवासी संघटनेच्या समूहात ट्रेन कॅन्सल्डचे स्क्रिनशॉट व्हायरल झाल्याने गोंधळात अधिकच भर पडली. गणेशोत्सवाच्या हंगामात वाढलेल्या गोंधळानंतर बुधवारी ९ सप्टेंबरपासून मुंबई-सावंतवाडी रोड एक्स्प्रेसचे आरक्षण सुरू होणार आहे, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *