पुतणीने प्रेमविवाह केल्याचा राग, प्लॅन बनवून तरुणाला तिघांनी घेरलं; पुण्यात पत्नीच्या नातेवाईकांकडून जावयासह भावांना बेदम मारहाण

प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणावर धारदार लोखंडी कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार सांगवी परिसरात समोर आला आहे. हल्लेखोरांनी तरुणाच्या डोक्यावर तसेच हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केलं आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपींपैकी एकाने पिस्तुल काढून तरुणाच्या दिशेने रोखत जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

प्रेमविवाहाचा राग मनात

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, काल मंगळवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास विशालनगर, पिंपळे निलख येथील एका इमारतीच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला. तक्रारदार अमोल अण्णासाहेब वीर (वय 33) हे हॉटेल व्यवसाय करतात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी सायली काळूराम लांडगे हिच्यासोबत प्रेमविवाह केला आहे. या प्रेमविवाहाचा राग मनात धरून तिचे चुलते अनिल पांडुरंग लांडगे यांच्या सांगण्यावरून आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संदीप तानाजी लांडगे आणि रोहन अर्जुन लांडगे यांनी अमोल वीर यांना शिवीगाळ करत धमकी दिली. त्यानंतर धारदार लोखंडी कोयत्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. संदीप लांडगे याने अमोल यांच्या हातावर आणि शरीराच्या इतर भागांवरही कोयत्याने वार केले. या हल्ल्यात अमोल वीर गंभीर जखमी झाले आहेत.

‘पिस्तुल काढ, याचा जीव घे…’

हल्ल्यादरम्यान आरोपी रोहन लांडगे याने संदीपला पिस्तुल काढून अमोल यांचा जीव घेण्यास सांगितल्याचा तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. यानंतर संदीपने कमरेला लावलेलं पिस्तुल बाहेर काढून अमोल यांच्या दिशेने रोखलं. अमोल वीर यांच्यासोबत त्यांचे भाऊ अनिकेत सदाशिव वीर आणि दीपक नानासाहेब वीर यांनाही मारहाण करण्यात आल्याचं पोलीस तक्रारीत नमूद आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी अमोल वीर यांच्या गळ्यातील अंदाजे तीन तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत.

चार आरोपींविरोधात गुन्हा

या प्रकरणी सांगवी पोलिसांनी संदीप तानाजी लांडगे, रोहन अर्जुन लांडगे, हर्षद काशीनाथ लांडगे आणि अनिल पांडुरंग लांडगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी कासारवाडी परिसरातील रहिवासी आहेत. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले दोन लोखंडी कोयते, एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमविवाहाचा राग… त्यातून थेट कोयता आणि पिस्तुलाचा वापर… या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी आरोपींना सांगवी पोलिस कधी बेड्या ठोकतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *