लग्नानंतरही पतीचे प्रेमपुराण संपले नाही. त्याची कुणकुण तिला लागली. हे सारे थांबव म्हणून खडसावण्यासाठी पतीच्या प्रेयसीला फोन लावला. सारे काही सुरळीत होणारे असे चित्र दिसून येत असतानाच ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त पुन्हा त्यांच्या प्रेमाचा अंकुर फुलला. प्रेयसीचा सकाळीच फोन आला आणि ती भडकली. प्रेयसीचे कार्यालय गाठून जाब विचारला. धक्काबुक्की… थप्पडमार झाले. प्रेयसीने तातडीने त्याला बोलावून घेतले. त्याने वाद सोडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर पती-पत्नी चौकात आले. तिच्या मनातील खदखद मात्र कायमच होती. त्यातूनच पुन्हा वाद झाला आणि तिने पतीलाच चोप दिला. बुधवारी छत्रपती चौकात ही खळबळजनक घटना घडली. तर पतीच्या प्रेमपुराणाविरुद्ध भडकलेली ही महिला नगरसेविका आहे.
शहरातील एका बड्या राजकीय पक्षाशी संबंधित ही नगरसेविका आहे. पश्चिम नागपुरातून ती प्रथमच निवडून आली. विशेष म्हणजे, या पक्षातील ती सर्वात कमी वयाची नगरसेविका आहे. या नगरसेविकेच्या पतीचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत. दोन दिवसांपूर्वी या प्रेयसीचे नगरसेविकेसोबत भांडण झाल्याची माहिती आहे. बुधवारी प्रेयसीचा फोन पतीला आल्याने नगरसेविका भडकली. तिने थेट प्रेयसीचे छत्रपती चौकात असलेले कार्यालय गाठले. कार्यालयात प्रेयसी व नगरसेविकेत कडाक्याचे भांडण सुरू झाले. वाद वाढून नगरसेविकेने प्रेयसीला धक्काबुक्की करीत थापड मारली. यामुळे संतापलेल्या प्रेयसीने प्रियकर असलेल्या नगरसेविकेच्या पतीला मोबाइलवरून माहिती दिली. दोघांमध्ये केलेल्या फोनवरून व पतीच्या संबंधावरून भांडण सुरूच होते. त्याचवेळी पतीदेव कार्यालयात धडकला. त्याला पाहून नगसेविका आणखी भडकली. तिने त्यालाही फैलावर घेतले. पतीने कसेबसे भांडण सोडविले. त्यानंतर दोघेही कार्यालयातून निघाले. छत्रपती चौकात येताच पुन्हा त्यांच्यात वाद वाढला. पतीने नगरसेविकेवर हात उगारला. त्यामुळे आधीच रागात असलेल्या नगरसेविकेनेही पतीवर हात उचलला व त्याला चोप देणे सुरू केले. चौकातच दोघांचे कडाक्याचे भांडणही सुरूच होते. या प्रकारामुळे तिथे गर्दी झाली. काहींनी भांडण रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, पती-पत्नी असल्याचे कळल्यावर काहींनी मागे हटणेच पसंत केले. परंतु, गर्दीतील काहींनी दोघांनाही ओळखले. त्यामुळे या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. दोघेही नंतर वेगवेगळे आपापल्या मार्गाने निघून गेले. या घटनेची माहिती सोशल मीडियावरही पसरली. प्रकार घडल्याने व बोंबाबोंब झाल्याने प्रकरण वाढू द्यायचे नाही, असे ठरले. त्यामुळे पोलिसात कुठलीही तक्रार करण्यात आली नाही. मात्र, हा प्रकार अनेकांनी बघितल्याने दिवसभर शहरात उलटसुलट चर्चा सुरू होती. या घटनेची माहिती नगरसेविका असलेल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना कळली. मेसेज व्हायरलमुळे मुंबईहूनही याबाबत माहिती घेण्यासाठी नागपुरात फोन आले. कोण ती नगरसेविका? अशी अनेकांकडून विचारणा झाली. त्यामुळे पक्षाची बदनामी होईल म्हणून पुढे काहीही करायचे नाही, असा संदेशही काहींनी दिल्याची माहिती आहे. या घटनेची चर्चा मात्र दिवसभर सुरूच होती. ‘व्हॅलेंटाइन डे’ ला प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलाऐवजी चोपही मिळू शकतो, असे मिश्कीलपणे अनेकजण एकमेकांना सांगत होते.
