मुंबईतील 1993 मधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी याकूब मेमनला 30 जुलैला फाशी देण्यात येणार आहे. नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये 53 वर्षीय मेमनला सकाळी 7 वाजता फासावर चढवण्यात येईल. मात्र फाशीच्या तारीख आणि वेळेत बदलही होऊ शकतो.
मेमनच्या फाशीची तारीख आणि वेळेबाबत मुख्यमंत्र्यांनी आधीच मान्यता दिली आहे. नागपूर प्रशासन आणि कोर्टांनीही याबाबत मंजुरी दिली आहे. तसंच त्याच्या कुटुंबियांनाही फाशीच्या तारखेबाबत माहिती देण्यात आली आहे. कायद्यानुसार दोषी आणि त्याच्या कुटुंबाला फाशीच्या 15 दिवस अगोदर माहिती देणं आवश्यक असतं.याकूबच्या शारीरिक आणि मानसिक चाचणीतून ती तंदुरुस्त असल्याची माहिती मिळते.
टाडा कोर्टाने 2007 साली याकूबला फाशीची शिक्षा सुनावली होती. भारतीय दंड कलम 120 ब नुसार बॉम्बस्फोटाचा कट रचल्याच्या आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. टाडा कोर्टाच्या निर्णयाविरोधातील त्याची याचिका मुंबई हायकोर्ट, सुप्रीम कोर्टासह राष्ट्रपतींनीही नाकारली होती.
याकूबला 27 जुलै 2007 रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याने कोर्टाचा दरवाजा ठोठावला. बॉम्बस्फोटांचा कट रचला असला तरी प्रत्यक्ष सहभाग नसल्याचा बचाव त्याने केला होता. प्रत्यक्ष सहभागी होऊन नागरिकांच्या मृत्यूला जबाबदार नसल्यामुळे फाशीची शिक्षा अयोग्य असल्याचा मुद्दा बचाव पक्षाच्या वकिलांनी उपस्थित केला.
कोण आहे याकूब मेमन ?
शेकडो नागरिकांच्या मृत्यूस जबाबदार असलेला याकूब मेमन पेशाने सी.ए. आहे. याकूब हा मेमन कुटुंबातील सर्वाधिक शिक्षण घेतलेला सदस्य आहे. त्याचा भाऊ टायगर मेमन हा 1993 च्या बॉम्बस्फोटांप्रकरणी मुख्य आरोपी आहे.
याकूब मेमनवरील आरोप :
याकूब मेमनवर बॉम्बस्फोटाचा कट रचणे, त्यासाठी वित्त पुरवणे, दोषींच्या राहण्याची व्यवस्था, पाकिस्तानमध्ये प्रशिक्षणाची आणि प्रवासाची तिकीटे पुरवणे, बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेली वाहनं पुरवणे, अवैध शस्त्र बाळगणे असे आरोप आहेत.
फाशी टळू शकते?
याकूब मेमनने सुप्रीम कोर्टात निवारक याचिका दाखल केली आहे. याकूबच्या फाशीपूर्वी याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याकूबची याचिका सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यास त्याच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती येऊ शकते. मात्र त्याला फाशी मिळाल्यास देशातील पहिल्या वहिल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फासावर चढवण्यात येणारा तो पहिला दोषी ठरेल.
1993 मधील साखळी बॉम्बस्फोट हे भारतातले पहिले महाभयंकर स्फोट होते. त्यात 257 जणांना जीव गमवावा लागला होता, तर 700 जण गंभीर जखमी झाले होते.

