अकोल्यात नोकरीसाठी तरुणाचं लैंगिक शोषण करणाऱ्या निरंजनकुमार गोयंका आणि जुगलकिशोर रुंगठा यांच्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न आता पडू लागला आहे. कारण तब्बल आठवडा उलटूनही दोघांना अटकही न झाल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
नोकरीच्या आमिषापायी आतापर्यंत महिलांचं लैंगिक शोषण झाल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या आहेत. मात्र आठवड्याभरापूर्वी अकोल्यात कायमस्वरुपी नोकरीसाठी दोघा पुरुषांकडून एका तरुणाचं लैंगिक शोषण झाल्याची बातमी आली आणि सर्वच जण हादरुन गेले.
महत्त्वाचं म्हणजे अकोलाच नाही, तर शैक्षणिक क्षेत्रात भारतीय सेवा सदन संस्थेचं नाव नावाजलेलं आहे. अकोल्यात या संस्थेच्या पाच मोठ्या शाळा आणि कॉलेजेस आहेत. मात्र आज या संस्थेचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयंका आणि माजी सचिव जुगलकिशोर रुंगठा यांच्यावर झालेल्या आरोपाने मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे प्रकरण?
नोकरीत कायम करण्याच्या आमिषाने संस्था चालकांनी एका युवकाचं अनैसर्गिक लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार, अकोल्यात घडला आहे. या युवकाने भारतीय सेवा सदन संस्थेच्या माजी अध्यक्ष आणि माजी सचिवांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.याप्रकरणी निरंजन कुमार गोयंका आणि जुगलकुमार रूंगठा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित युवक हा अकोल्यातील राधादेवी गोयंका महिला महाविद्यालयात रोजंदारीवर काम करतो. 27 वर्षीय असलेला हा युवक गेल्या सात वर्षांपासून इथे कार्यरत आहे. मात्र त्याला नोकरीत कायम करतो, असं आमिष दाखवून त्याचं अनैसर्गिक लैंगिक शोषण करण्यात आलं. या सर्व प्रकारामुळे पीडित तरूणाने या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल झाला आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पीडित तरूणाला धमकी देण्यात येत आहे.

