दुष्काळ, नापीकी आणि वाढता कर्जाचा डोंगर यामुळे महाराष्ट्रातले अनेक शेतकरी पिचलेले आहेत. लेकरांसारखी वाढवलेली पिकं डोळ्यांदेखत सुकताना न पाहवल्यामुळे अनेक शेतकरी जीव देतात. मात्र वर्ध्यातल्या 7 शेतकऱ्यांनी चक्क सरकारकडे आत्महत्येची परवानगीच मागितली आहे.
परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की 3 महिला आणि 4 पुरुष शेतकऱ्यांनी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली आहे, अशी माहिती शेतकरी प्रश्नांसाठी लढणाऱ्या विदर्भ जन आंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली आहे.
किशोर इंगळे, भानुदास वडाडकर, पंकज गावंडे, शंकर खडसे, कुंदाबाई लोणकर, कमला वऱ्हाडे, वसंता गिनगावकर अशी आत्महत्येची परवानगी मागणाऱ्या वर्ध्यातल्या वडाड गावातील शेतकऱ्यांची नावं आहेत. महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नुकसानभरपाईच्या आश्वासनामुळे आश्वस्त झालेले शेतकरी जानेवारीपासून भरपाई पदरी पाडून घेण्यासाठी झटत होते. 10 दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्येच्या परवानगीचं पत्र स्थानिक अधिकाऱ्यांना सुपूर्द केलं.
शेतकऱ्यांच्या ‘या’ पत्राची खल घेत अधिकाऱ्यांनी ते तहसीलदाराकडे पाठवलं. शासनाच्या नियमानुसार दुष्काळ, गारपीट इत्यादीसाठी प्रत्येक शेतकऱ्याला 4 हजार रुपयांची मदत मिळणे अपेक्षित आहे. मात्र जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे गेल्या 6 महिन्यांपासून बँक खात्यात ही रक्कम धूळ खात पडली आहे, अशी माहिती तिवारी यांनी दिली

