चालक मोबाईलवर बोलण्याने एस.टी.ला अपघात

रविवारी मौदाजवळ महालगाव परिसरात एसटी-टिप्परच्या अपघातासाठी एसटी चालकाचे मोबाईलवर बोलणे एक कारण असल्याचा ठपका एसटीच्या प्राथमिक तपासणी अहवालात ठेवण्यात आला असून त्याला एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. या अपघातात एसटी चालकासह दोघांचा मृत्यू, तर २० प्रवासी जखमी झाले होते, हे विशेष.

एसटी प्रशासनाने रविवारी झालेल्या अपघाताची दखल घेत त्वरित चौकशी सुरू केली. बसमधील काही प्रवाशांनी नागपूरहून बस सुटल्यावर अधूनमधून चालक हेमंत प्रल्हाद कापसे (३०) हा मोबाईलवर बोलत असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले. दुर्घटनेच्या काही मिनिटांपूर्वीही कापसे मोबाईलवर बोलत होते. या दरम्यान अचानक समोर टिप्पर बघून त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर क्षणात या बसची टिप्परला जोरदार धडक बसली, असे प्रवाशांनी सांगितले. काही प्रवाशांनी ही धडक उभ्या टिप्परला तर काही प्रवाशांनी टिप्परचा टायर फुटल्यावर तो एसटी बसच्या दिशेने जोरात वळल्याने धडक बसल्याचे सांगितले. एसटी प्रशासनाला आता पोलिसांकडून येणाऱ्या अहवालाची प्रतीक्षा आहे. दोन्ही अहवाल एकत्र आल्यावर अपघाताचे खरे कारण पुढे येणार आहे.

दरम्यान, रविवारी नागपूर- तुमसर मार्गे कटंगीला जाणारी एसटी बस (क्रमांक एमएच-४०, ८९९४) नागपूरहून तुमसरकडे ४० प्रवासी घेऊन निघाली. महालगाव परिसरात बसची टिप्परला धडक बसली. त्याचवेळी मागून येणारे चारचाकी वाहनही एसटीवर धडकले. या अपघातात एसटीचा चालक हेमंत कापसे आणि प्रवासी इंदुसान ठाकरे (७०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर २० प्रवासी जखमी झाले. त्यातील दोन प्रवासी अत्यवस्थ होते. मेयोत त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच धोक्याबाहेर येण्याची आशा मेयोच्या डॉक्टरांनी वर्तवली. दरम्यान, मेयोतून सुट्टी घेतलेल्या बऱ्याच रुग्णांवर विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही नातेवाईकांचे म्हणणे आहे.

मोबाईल बंदीचे उल्लंघन

जिल्ह्य़ात एसटी महामंडळाकडे सुमारे ५७० बस असून एक हजार चारशेच्या जवळपास रोज फेऱ्या राज्याच्या विविध भागात होतात. महामंडळाने प्रवासी वाहतुकीकरिता सुमारे तीन हजार शंभर रुपये कर्मचारी नियुक्त केले आहेत. सेवा देताना बस चालकाने मोबाईलवर बोलू नये, असे नियम आहे. परंतु अनेक चालक वाहन चालवताना मोबाईलवर बोलतात. प्रवाशांच्या सुरक्षेकरिता अशा प्रकारांवर नियंत्रण घालणे गरजेचे आहे. त्याकरिता एसटी प्रशासन काय उपाय करणार? याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *