राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीकरिता ठाणे जिल्हा काँग्रेसच्या वतीने गुरुवारी काढण्यात आलेल्या मोर्चाने अवघ्या शहराची कोंडी केली. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न काँग्रेसने या मोर्चातून केला खरा; पण या मोर्चामुळे ठाणेकरांचे जबर हाल झाल्याने मोर्चेकऱ्यांच्या नावाने खडे फोडतच वाहनचालकांनी गाडय़ा पुढे सरकवल्या. कळवा नाका, जिल्हा शासकीय रुग्णालय, टेंभीनाका, कोर्टनाका, जांभळीनाका, मीनाताई ठाकरे चौक अशा प्रमुख मार्गावर तब्बल दीड तास वाहने अडकून पडल्याचे चित्र गुरुवारी सकाळी दिसून आले. राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनाचा फटका सर्वसामान्यांना कसा बसतो, हे या निमित्ताने दिसून आले. रुग्णालयाकडे जाणारे रुग्ण तसेच शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांनाही या मोर्चामुळे मनस्ताप सहन करावा लागला.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीकरिता ठाणे काँग्रेस पक्षातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये ठाणे तसेच नवी मुंबई शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या मोर्चानिमित्ताने काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शासकीय विश्रामगृह परिसरात जमले होते. त्यामुळे या भागातील वाहतुकीस काहीसा अडथळा होऊ लागला. त्यानंतर काही वेळाने या चौकातील मार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. परिणामी या मार्गाला जोडणाऱ्या कळवा, जिल्हा शासकीय रुग्णालय, टेंभीनाका, कोर्टनाका, जांभळीनाका, मीनाताई ठाकरे चौक अशा सर्वच मार्गावर आणि या भागातीस चौका चौकांमध्ये वाहतूक कोंडी झाली.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांची पथके तैनात करण्यात आली होती. मात्र, मोर्चेकरी जागेवरून हलण्यास तयार नसल्याने वाहतूक पुढे सरकतच नव्हती. तब्बल एक ते दीड तास झालेल्या या वाहतूक कोंडीचा मनस्ताप ठाणेकरांना सहन करावा लागला. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरील मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रुग्णांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन आलेल्या रुग्णवाहिका या कोंडीत अडकल्या होत्या. या कोंडीतून वाट काढण्यासाठी रुग्णवाहिकांना सायरन देत होत्या पण, पुढे सरकण्यासाठी कोंडीमुळे जागाच मिळत नव्हती. अखेर वाहतूक पोलिसांनी कोंडीतून रुग्णवाहिकांना वाट करून दिली.
काँग्रेसच्या मोर्चामुळे ठाण्याची कोंडी!

