शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची इंजिनीयरिंगची पदवी बनावट असल्याने ते आधीच वादात सापडले असताना तावडे यांनी दहावीची परीक्षाही डमी बसवून पास केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
उच्च शिक्षणाची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राला बोगस शिक्षणमंत्री लाभल्याने मध्य प्रदेशातील ‘व्यापमं’सारखा मोठा घोटाळा येथेही होऊ शकतो, अशी टीकाही मलिक यांनी केली. तसेच बोगस पदवीधर असलेल्या तावडे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून ताबडतोब हकालपट्टी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत तावडे यांनी हेआरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडू, असे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत मलिक बोलत होते.
तावडे यांचा अग्निशमन यंत्रणेतील घोटाळा आणि महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या ‘चिक्की घोटाळा’ प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या दोन्ही प्रकरणांची लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या वतीने चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दहा वर्षातील खरेदी प्रकरणांची चौकशी करू, या घोषणेची मलिक यांनी खिल्ली उडवली. दोन्ही मंत्र्यांना वाचवण्याचा हा प्रयत्न असून त्याबाबत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले.
शिक्षणमंत्रीपद भूषवणा-या तावडे यांनी सोशल नेटवर्कवर आपली शैक्षणिक पात्रता इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयर अशीच कायम ठेवली आहे. ही जनतेची घोर फसवणूक आहे. त्यांचे ज्ञानेश्वर विद्यापीठ हे केवळ १२ वी नापास विद्यार्थ्यांना इंजिनीयर बनवण्याची जाहिरात करते.
त्यामुळे तावडे हे १२ वी नापास आहेत. मात्र प्रत्यक्षात ते अकरावीसुद्धा नाहीत. तावडेंनी दहावीची परीक्षाही डमी बसवून दिल्याचा आरोप करून मलिक यांनी सनसनाटी उडवून दिली. आपण हे सिद्ध करू शकतो, असाही त्यांनी दावा केला.

