राज्यात सर्व धरणांमध्ये सरासरी २६ टक्के पाणीसाठा

 राज्यात सर्व धरणांमध्ये सरासरी २६ टक्के पाणीसाठा

वेळेत सुरू झालेल्या पावसाने पुन्हा दडी मारल्याने राज्यातील धरणांमधील पाणीसाठा आटू लागला आहे. गेल्या वर्षीपेक्षा परिस्थिती बरी असली, तरी सध्या सर्व धरणांमध्ये सरासरी २६ टक्के इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्याची परिस्थिती चिंताजनक असून, तेथील धरणांमध्ये फक्त सात टक्के इतका उपयुक्त साठा आहे. कोकणात सर्वाधिक, म्हणजे ४८ टक्के, तर पुणे विभागातील धरणांमध्ये तीस टक्के उपयुक्त साठा आहे.

राज्याच्या विविध विभागांमध्ये यंदा मान्सून वेळेत दाखल झाला; मात्र काही दिवस समाधानकारक पाऊस झाल्यानंतर त्याने पुन्हा दडी मारली आहे. गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळ पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पेरण्या संकटात सापडल्या आहेत. त्याबरोबरच धरणांमधील पाणीसाठाही तळ गाठू लागल्याने अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यंदा राज्यातील सर्व मोठ्या, मध्यम आणि लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये २६ टक्के इतका उपयुक्त साठा आहे. ही स्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत बरी आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण १८ टक्के इतके होते.
कोकणातील धरणांमध्ये सर्वाधिक म्हणजे ४८ टक्के इतका उपयुक्त साठा आहे. मराठवाडा विभागात सात टक्के, नागपूर विभागात २७ टक्के, अमरावती विभागात ३३ टक्के, नाशिक विभागात २१ टक्के, तर पुणे विभागातील धरणांमध्ये ३० टक्के इतका उपयुक्त साठा आहे.

गेल्या काही वर्षांत जूनमध्ये विश्रांती घेतल्यानंतर जुलै महिन्याच्या उत्तरार्धात जोरदार पाऊस पडतो आणि धरणे भरून वाहू लागतात, असा अनुभव आहे. यंदाही त्याची पुनरावृत्ती होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

२२ जिल्ह्यात १३०० टँकर

पावसाने पुन्हा दडी मारल्याने राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये १ हजार ३१६ टँकरने पाणी पुरविण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. ऐन पावसाळ्यामध्ये १,०३६ गावे आणि १,९२० वाड्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड तसेच नाशिक व नगर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. पावसाची स्थिती आणखी काही दिवस अशीच राहिल्यास टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबईत तीन महिन्यांचा पाणीसाठा

जूनच्या पहिल्या पंधरवड्यात धो धो कोसळलेल्या पावसाने नंतर दडी मारली असली, तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये तब्बल तीन महिने पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात पाऊस न पडल्यास मात्र महापालिकेला पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

पाणीसाठा (एमएलडीमध्ये)

तलाव – २०१४ – २०१५

मोडकसागर – ५६,९५७ – ५६,४३७

तानसा – १०,६८३ – २६७९६

विहार – ५६५ – ७,७५२

तुळशी – २,७५६ – ४,७८१

भातसा – २४,४०९ – ९२,४९०

मध्य वैतरणा – – – ० १,२२,९५६

तलावात एकूण पाणीसाठा (एमएलडीमध्ये)

२०१४ – ९५३७०

२०१५ – ३११२१२

धरणातला यंदाचा उपयुक्त साठा (%)

टेमघर १

पानशेत ३८ ६

वरसगाव १७

खडकवासला ४८

पवना ३८

भाटघर ३०

उजनी ०

धोम २८

उरमोडी ८१

वारणा ६२

कोयना ४६

जायकवाडी १

मांजरा ०

दारणा ५३

गंगापूर ४२

मुकणे ५ ०

गिरणा ९

भंडारदरा २६

मुळा ५

पेंच तोतलाडोह १४

इटियाडोह १२

गोसीखुर्द ७०

ऊर्ध्व वर्धा ५२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *