ठाणे शहराचे सौंदर्य खुलवण्यासाठी महानगरपालिकेतर्फे काही दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा करीत उभे केलेल्या सेल्फी पॉइंटची नागरिकांकडून दुर्दशा झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. गडकरी रंगायतनच्या प्रवेशद्वारापाशीच असलेल्या पदपथावर अंतराळातील विश्व दाखवणारे भित्तिपत्रक काही दिवसांपासून नागरिकांना आकर्षित करीत होते. या ठिकाणी नागरिकांनी येऊन सेल्फी काढावे यासाठी महापालिकेने तशी व्यवस्थाही केली. मात्र, सध्या या भित्तिपत्रकावर नागरिकांनी पानाच्या पिचकाऱ्या मारून हे ठिकाण अस्वच्छ केले आहे.
शहर स्वच्छतेच्या आघाडीवर ठाणे शहराचा नावलौकिक वाढावा यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू केले आहेत. वर्तकनगर परिसरातील कॅडबरी रस्त्याचे रुंदीकरण केल्यानंतर महापालिकेने या भागातील िभती रंगविण्याचा मोठा उपक्रम हाती घेतला. शहरातील शेकडो कलाकारांनी रंगविलेल्या या भिंती आकर्षणाचा विषय ठरला आहे. मूळ शहरातही असाच एखादा उपक्रम हाती घ्यावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न केले जात होते. मूळ शहरात रेल्वे स्थानक, गडकरी रंगायतन, तलावपाळी या भागात नागरिकांचा मोठय़ा प्रमाणावर वावर असतो. आठवडय़ाच्या अखेरीस गडकरी आणि तलावपाळीच्या कट्टय़ावर मोठय़ा संख्येने तरुणाई जमत असते. हे लक्षात घेऊन महापालिकेने गडकरी रंगायतनलगत सेल्फी कट्टा उभा केला. मात्र, या व्यवस्थेचे काही ठाणेकरांकडूनच दुर्दशा झाल्याचे चित्र अनेकांना अस्वस्थ करू लागले आहे.
अंतराळातील विश्वाचे स्वरूप दाखवणारे रंगीबेरंगी भित्तिपत्रक गडकरी रंगायतनबाहेर लावण्यात आले आहेत. या ठिकाणी रंगीबेरंगी दिव्यांनी आकर्षक रोषणाई केल्याने तरुण-तरुणी सेल्फीचा आनंद घेत असतात. मात्र या भित्तिपत्रकांवर काही नागरिकांनी थुंकून परिसर अस्वच्छ केला आहे. सेल्फी पॉइंटजवळच छायाचित्रासाठी ठेवण्यात आलेले अवकाशयान तलावाजवळच असलेल्या कचऱ्यामध्ये टाकण्यात आले आहे.