लग्न मांडवाजवळ ट्रान्सफॉर्मरचा स्फोट, १४ जणांचा मृत्यू

राजस्थानमधील जयपूर येथे लग्न मांडवाजवळ ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने १४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून राजस्थानच्या उर्जा मंत्र्यांनी चौकशीचे आदेशही दिले आहेत.

शाहपूरा येथील खातोलाई गावात मंगळवारी लग्नाची तयारी सुरु होती. गावातील मुलीचे लग्न असल्याने सर्वच मंडळी वधूच्या घरात जमली होती. लग्नमांडवात गावातील महिला गाणी गात होत्या. तर लहान मुले या गाण्यांवर नाचत होती. याच दरम्यान ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला आणि घटनास्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये लहान मुलीचा समावेश आहे. तर सात जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आणि जखमींमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. जखमींवर जयपूरमधील एसएमएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मंगळवारी संध्याकाळी ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. वीज वितरण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. ‘गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार नाही’ असा इशाराच ग्रामस्थांनी दिला होता. शेवटी जिल्हाधिकारी सिद्धार्थ महाजन हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिले आणि ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.  राजस्थानचे उर्जा मंत्री पुष्पेंद्र सिंह यांनी देखील रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. या दुर्घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिल्याचे सिंह यांनी माध्यमांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *