बोस कंपनीने जगात पहिल्यांदाच गुगल असिस्टंटची सुविधा असणारा ‘क्युसी ३५ २’ हा वायरलेस हेडफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
गुगल असिस्टंटच्या मदतीने कुणीही ध्वनी आज्ञावलीवर आधारित विविध फंक्शन्सचा वापर करू शकतो. आजवर स्मार्टफोन तसेच स्मार्ट स्पीकरमध्ये हा व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. आता बोस कंपनीने आपल्या वायलेस हेडफोनमध्ये गुगल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत दिला आहे. ही सुविधा असणारे बोस ‘क्युसी ३५ २’ हे मॉडेल नुकतेच बाजारपेठेत सादर करण्यात आले आहे.
गुगल कंपनीने जाणीवपूर्वक आपल्या गुगल असिस्टंटची व्याप्ती वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वीच थर्ड पार्टीजसाठी याचा ‘एपीआय’ खुला करण्यात आला होता. यानंतर सोनी आणि अन्य कंपन्यांनी आपल्या याचा वापर करून विकसित केलेले स्मार्ट स्पीकर बाजारपेठेत सादर केले आहेत. यातच बोस कंपनीने वायरलेस हेडफोनमध्येही याचा वापर केल्यामुळे गुगल असिस्टंटच्या वापराला एक नवीन उपकरण मिळाले आहे. अर्थात आगामी कालखंडात अन्य वायरलेस हेडफोनमध्येही गुगल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत मिळू शकतो. आणि व्यापक दृष्टीकोनातून याचा विचार केल्यास व्हाईस कमांडवर आधारित उपकरणांची संख्यादेखील वाढू शकते.
