पिंपरी चिंचवडमध्ये १७ गाड्यांची तोडफोड

चिंचवड येथील गांधी पेठेत पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके आणि सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने सतरा गाड्यांची तोडफोड केली आहे. यामध्ये गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडमधील गांधी पेठ येथे विक्की घोलप आणि प्रशांत यादव यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर विकी घोलप हा पोलिसात तक्रार देण्यासाठी गेला तर प्रशांत हा दवाखान्यात गेला होता. त्यावेळी विकी घोलपच्या पाच-सहा मित्रांनी येऊन लाकडी दांडके आणि सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने तेथील गाड्यांची तोडफोड केली. यात गाड्यांचे मोठ्या प्राणावर नुकसान झाले आहे.

टोळक्याने एकूण १७ वाहनांची तोडफोड केली असून यामध्ये दोन स्कूल व्हॅन, रिक्षा आणि चार चाकी वाहनांचा समावेश आहे. विकी घोलप याच्यावर या अगोदरदेखील चिंचवड पोलिसात ३०७ नुसार गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात तोडफोड करणाऱ्या टोळक्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

या अगोदर पिंपळे निलख या परिसरात काही समाजकंटकांनी कोयत्याने आणि लाकडी दांडक्याने १३ गाड्यांची तोडफोड केली होती. यामध्ये चारचाकी गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सांगवी, पिंपळे गुरव, नेहरू नगर, साने चौक, निगडी येथेदेखील तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. तोडफोडीचे सत्र थांबत नसल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *