रास्त धान्य दुकानांमधून ५ किलोचे गॅस सिलेंडर

राज्यातील सर्व सरकारमान्य रास्त भाव दुकानांमधून व केरोसिन विक्रेत्यांमार्फत पाच किलोच्या गॅस सिलेंडरची विक्री करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. रास्त भाव धान्य दुकानांमधून मुक्त केरोसिन विक्रीलाही (फ्री-सेल) परवानगी देण्यात आली आहे. लहान गॅस सिलेंडर साधारणत ४५० रुपयाला मिळेल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

शहरी व ग्रामीण भागातही स्वयंपाकाच्या गॅसचा जास्तीतजास्त वापर होऊ लागल्याने, केंद्र सरकारने केरोसिनचा कोटा कमी करण्यास सुरुवात केली आहे. राज्याला सध्या एकूण गरजेच्या फक्त १८ टक्के म्हणजे महिना ३३ हजार किलो लिटर केरोसिन मिळते. त्यामुळे सध्या फक्त स्वंयपाक व दिवाबत्तीसाठी केरोसिनची विक्री केली जाते. परंतु त्याचबरोबर विविध स्तरांतून औद्योगिक, कृषी, मत्स्य व्यवसाय व इतर कारणांसाठी अनुदानित केरोसिनची मागणी करण्यात येते. मात्र केसोसिनची उपलब्धता कमी असल्याने ही मागणी पूर्ण करणे शासनाला शक्य होत नाही. त्यावर मार्ग काढण्यासाठी लहान गॅस सिलेंडरची उपलब्धता करून देऊन अनुदानित केरोसिन वाचवून त्याचा अन्य कारणांसाठी वापर करण्यास उपयोग होऊ शकतो. याचा विचार करून रास्त भाव दुकानांतून ५ किलोचे गॅस सिलेंडर वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने गुरुवारी तसा आदेश काढला आहे.

राज्यात ५२ हजार रास्त भाव दुकाने आहेत. मोठय़ा प्रमाणावर फ्री-सेल केरोसिन विक्री करणारे परवानाधारक विक्रेतेही आहेत. स्वस्त भाव दुकाने व केरोसिन विक्रेत्यांमार्फत गॅस सिलेंडर वितरण केले जाणार आहे. मात्र एका वेळी शंभर किलोपेक्षा जास्त म्हणजे २० पेक्षा अधिक सिलेंडरचा साठा करता येणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागातील सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाच किलोचा एक गॅस सिलेंडर ४५० रुपयाला मिळेल. त्यासाठी ९०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ग्राहकांना अडचणीच्या वेळी तात्पुरती निकड भागविण्यासाठी गॅस सिलेंडर मिळण्याची सोय होणार आहे. त्याचबरोबर खुल्या बाजारभावाप्रमाणे केरोसिनही ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *