८२ वर्षांची ‘रिव्हॉल्वर दादी’ नेमबाजीत तरबेज!

वय वर्षे ८२ असणाऱ्या चंद्रो तोमर ‘रिव्हॉल्वर दादी’ म्हणून गावात प्रसिद्ध आहेत. हातात बंदूक घेऊन लक्ष्यावर अचूक निशाणा साधण्यात त्या तरबेज आहेत. त्यांचं बंदूकबाजीचं कौशल्य पाहिलं की भलेभले तोंडात बोट टाकून त्यांच्याकडे बघत बसतात. ज्या वयात आरोग्याच्या समस्यांनी ग्रासून माणूस अंथरुणाला खिळलेला असतो, त्यावयात चंद्रो आजी मात्र नेमबाजीच्या स्पर्धेत मोठ्या उत्स्फूर्तपणे भाग घेताना दिसतात. आजींनी नेमबाजीच्या २५ राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत.

उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात त्या राहतात. वयाच्या ६५ व्या वर्षापासून त्यांनी बंदूक चालवण्यास सुरूवात केली. काही वर्षांपूर्वी चंद्रो यांची नात शेफाली नेमबाजीचे धडे घेत होती. पण हातात बंदूक येताच तिला घाम फुटला. तिला काही केल्या बंदूक लोड करता येईना. नातीची भीती पाहून आजींनी स्वत: बंदूक लोड केली आणि निशाणा साधला. विशेष म्हणजे यापूर्वी कधीही चंद्रो यांनी हातात बंदूक घेतली नव्हती. त्यांची नेमबाजी पाहून शेफालीचे कोच आश्चर्यचकित झाले. या आजींमध्ये काहीतरी वेगळं आहे हे त्यांनी चटकन हेरलं. या घटनेनंतर चंद्रोना नेमबाजीचं अधिकृत शिक्षण देण्यात आलं. आज चंद्रो अनेक नवख्या मुलींना नेमबाजीचे धडे देत आहे. चंद्रो यांना ६ मुलं आणि १५ नातवंडं आहेत. रोज सकाळी घरकाम आटोपल्यानंतर आजी नेमबाजीचा सराव करतात. त्यांनी वेगवेगळ्या स्पर्धांत १०० हून अधिक पदकं जिंकली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *