रामरहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत अजूनही फरार

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख रामरहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत इन्सान आणि या संस्थेचा प्रवक्ता आदित्य इन्सान अजूनही फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. बुधवारी पोलिसांनी मुंबई आणि नेपाळनजीकच्या काही भागांमध्ये यांचा शोध लावण्यासाठी छापे घातले. डेरा कार्यकर्ते हनीप्रीत आणि आदित्य यांना शोधण्यासाठी आम्ही इतर राज्यांची मदत घेत असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे हरयाणा पोलीस संचालक बी एस संधू यांनी सांगितले.

नेपाळ सीमेजवळील लाखीमपूर खेरी येथे त्यांच्या मागावर पोलिसांची तुकडी पाठवण्यात आली आहे. हनीप्रीत भारत-नेपाळ सीमा ओलांडून नेपाळमध्ये पळून गेली असल्याचा संशय पोलिसांना आहे. हरयाणा पोलिसांनी १ सप्टेंबर रोजी हनीप्रीत आणि राम रहीमच्या इतर जवळच्या कार्यकर्त्यांना देश सोडून जाण्याची बंदी घालण्यासाठी नोटीस काढली होती. त्याचप्रमाणे हनीप्रीतला अटक केल्यानंतर डेरा कार्यकर्ता सुरिंदर धिमन इन्सानबाबत चौकशी करण्यात येणार आहे.

राम रहीमला शिक्षा सुनावल्यानंतर सीबीआय कोर्टामधून पळवून नेण्याचा कथित कट केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणात सुरिंदर धिमन आणि आदित्यविरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *