ब्लू व्हेल या खेळाच्या नादात आपला जीव धोक्यात घालणाऱ्या २२ वर्षीय अलेक्झांडरनं त्याला आलेल्या वाईट अनुभवाचं कथन जगापुढे केलंय. ‘हा अनुभव वेदनादायी होता,’ अशा शब्दांत गेल्या काही दिवसांपासून त्याला झालेल्या त्रासाचं वर्णन त्यानं केलंय. पुद्दुचेरी येथे राहणाऱ्या अलेक्झांडरच्या एकूणच वागण्यात गेल्या काही दिवसांपासून घरच्यांना बदल जाणवत होते. तो ब्लू व्हेलच्या आहारी गेला असावा, अशी शंका त्याच्या भावाला आली. ही शंका काही दिवसांनी खरीदेखील ठरली. त्याने ताबडतोब याची माहिती पोलिसांना दिली.
पोलीस पहाटे चारच्या सुमारास अलेक्झांडर घरी पोहोचले, तेव्हा सुरीनं हातावर ब्लू व्हेलचं चित्र कोरण्याच्या प्रयत्नात तो होता. जर पोलिसांना पोहोचायला उशीर झाला असता तर नक्कीच त्याने आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं असतं. अलेक्झांडरच्या एका सहकाऱ्यानं व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमध्ये ब्लू व्हेल खेळाची लिंक त्याला आली. हा गेम खेळण्याची तीव्र इच्छा अलेक्झांडरला झाली. याच इच्छेमुळे तो आपला जीवही धोक्यात घालायला तयार झाला. मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेतल्यानंतर तो या सगळ्यांतून बाहेर आलाय. पण गेल्या काही महिन्यांपासून तो जे काही अनुभवत होता, ते सर्व भयानक अनुभव त्यानं जगासमोर मांडले आहेत.
‘ब्लू व्हेलमध्ये ग्रुप अॅडमिन आपल्याला रोज रात्री दोन वाजता वेगवेगळी आव्हानं पूर्ण करण्यासाठी द्यायचा. एकदा रात्री दोननंतर दफनभूमीत जाऊन मला स्वत:चा सेल्फी पाठवण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. ते मी पूर्ण केलं होतं. रोज रात्री मला भयपट पाहायला दिले जायचे. माझी मानसिक अवस्था हळूहळू खालावत होती. या सगळ्याचा मला खूप त्रासही होत होता. पण या खेळाचं इतकं वाईट व्यसन मला लागलं होतं, की ते थांबवावं असं मला वाटलं नाही. या खेळाच्या नादात मी कामावर जाणं बंद केलं. स्वत:ला मी एका खोलीत कोंडून घेऊ लागलो. घरच्यांसोबत बोलणंही बंद केलं. हा खेळ म्हणजे मृत्यूचा सापळा आहे, तेव्हा कोणीही तो खेळून आपलं आयुष्य उद्धवस्त करु नका’ असं आवाहन त्यानं तरुणांना केलंय.
