व्यापमं ची सीबीआय चौकशीसाठी हायकोर्टाला पत्र लिहिणार – शिवराजसिंह चौहान

व्यापमं ची सीबीआय चौकशीसाठी हायकोर्टाला पत्र लिहिणार – शिवराजसिंह चौहान

एका मागून एक गूढ मृत्यू होत असल्यामुळे देशभर चर्चेत असलेल्या व्यापमं घोटाळ्याची केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी करावी, यासाठी आपण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिणार असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. या प्रकरणातील सत्य सर्वांसमोर आलेच पाहिजे. त्यामुळेच लोकभावना लक्षात घेऊन सीबीआय चौकशी करावी, असे आपले मत बनल्याचे त्यांनी सांगितले.
व्यापम घोटाळ्याची न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयकडून चौकशी करावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीसुद्धा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर येत्या गुरुवारी सुनावणी होणार आहे.
व्यापमं घोटाळ्यात आतापर्यंत झालेल्या सर्व मृत्यूंचीही सीबीआयने चौकशी करावी, असेही शिवराजसिंह चौहान यांनी म्हटले आहे. आतापर्यंत झालेल्या चौकशीबद्दल मला विश्वास आहे. पण केवळ लोकभावना लक्षात घेऊन आणि खूप विचार करून सीबीआय चौकशी केली जावी, असे आपल्याला वाटते, असेही ते म्हणाले. या प्रकरणात विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप हे केवळ राजकीय असल्याची टीकाही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *