बॉम्बच्या अफवेने दिल्ली विमानतळावर विमानचे इमर्जन्सी लँडिंग

बॉम्बच्या अफवेने दिल्ली विमानतळावर विमानचे इमर्जन्सी लँडिंग

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी विमानात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेमुळे तुर्कीश एअरलाईन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. बँकॉककडून इस्तंबूलच्या दिशेने जाणाऱ्या या विमानात १४८ प्रवाशी होते. अधिकाऱ्यांच्या माहितीनूसार या विमानातील स्वच्छतागृहाच्या आरश्यावर निनावी व्यक्तीने या विमानातील सामान ठेवण्याच्या कक्षात बॉम्ब ठेवल्याचा संदेश लिहला होता. साधारण दुपारी सव्वाच्या सुमारास आरश्यावर लिपस्टीकने लिहलेला ‘बॉम्ब इन कार्गो’ हा संदेश तेथील कर्मचाऱ्यांच्या दृष्टीस पडला. त्यांनी या सगळ्याची माहिती वैमानिकाला दिल्यानंतर त्याने तत्काळ हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. नियंत्रण कक्षाकडून ही माहिती मिळाल्यानंतर दिल्ली विमानतळावर आपातकालीन परिस्थितीच्यादृष्टीने सर्व सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या होत्या. अग्निशमन दल आणि एनएसजीचे बॉम्बशोधक पथक धावपट्टीवर दाखल झाले होते. त्यानंतर हे विमान एका वेगळ्या धावपट्टीवर उतरविण्यात आले. सुरक्षा यंत्रणांनी विमानाचा ताबा घेत संपूर्ण विमानाची कसून तपासणी केली. मात्र, या तपासणीत कोणतीही स्फोटके मिळाली नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *