सुरक्षेच्या दृष्टिने अतिसंवेदनशील असणार्या मुंबईतील भाभा अणूशक्ती संशोधन केंद्राच्यावर २० मीटरपर्यंत संशयास्पद ड्रोन उडत असल्याचे दिसून आले. सुमारे २५ मिनिटांपर्यंत हा ड्रोन घिरट्या घालत होता आणि नंतर तो गायब झाला. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात ड्रोनने शूटिंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भाभा अणुकेंद्र दहशतवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’वर आहे. त्यामुळे येथे कडक सुरक्षा आहे. असे असतानाही मुंबईतील देवनार भागात असलेल्या टाटा संशोधन केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर टूरिस्ट गाडीतून आलेल्या तीन जणांनी दोन ड्रोनच्या मदतीने हे चित्रिकरण केले. या प्रकरणी संशोधन केंद्रातील प्रा. व्यंकट बाबू यांची चौकशी करण्यात आली. तसेच या प्रकरणी पोलिसांनी एका अपरिचित व्यक्तीला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.
देशाचा पहिला अणूशक्ती प्रकल्प असलेल्या भाभा संशोधन केंद्राचे उद्घाटन १९५७ मध्ये पंडित नेहरू यांनी केले. १९६७ मध्ये या केंद्राला होमी भाभा यांचे नाव देण्यात आले.

