कर्जत पनवेल प्रवासी रेल्वेच्या प्रतीक्षेत

कर्जत पनवेल प्रवासी रेल्वेच्या प्रतीक्षेत

मुंबई-पुणे अंतर रेल्वे मार्गाने कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पनवेल-कर्जत या मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे. रेल्वे प्रशासनाकडून ‘मेमू’ गाडी सुरू करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे लेखी उत्तर देण्यात आले होते.

मात्र मागील चार वर्षात त्यावर कोणताही निर्णय न घेता आपल्या राज्यातील असलेल्या केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी आता या मार्गासाठी दुसरी मार्गिका टाकण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचे स्वागत आहे. परंतु प्रवासी वाहतूक कधी सुरू करणार हा प्रश्न अधांतरी आहे. मेमू किंवा लोकलगाडी सुरू करण्याच्या दृष्टीने या दुस-या मार्गाच्या कामाचा विचार व्हावा, अशी मागणी प्रवासी संघटनेची आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कर्जत-पनवेलसाठी दुसरी मार्गिका टाकण्यासाठी आधी तरतूद आणि नंतर घोषणा केली आहे. त्यानंतर या पर्यायी मार्गाची प्रतीक्षा करणा-या प्रवाशांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यात या २९ किलोमीटर लांबीच्या मार्गाची निर्मिती झाल्यानंतर तब्बल चार वष्रे सातत्याने सुरक्षा चाचण्या सुरू होत्या.

त्यानंतर सुरुवातीला मालवाहू गाडी आणि नंतर दोन वर्षानी पहिली मेल एक्स्प्रेस गाडी २००७ मध्ये या मार्गावर रेल्वेने सुरू केली. सुरुवातीला नाशिक- पनवेल-पुणे ही गाडी या मार्गावरून धावत होती. आता तब्बल आठ गाडय़ा धावू लागल्या. मात्र त्यातील दोन मेल एक्स्प्रेस गाडय़ा कर्जत येथे येता-जाता थांबत आहेत. अन्य गाडय़ांमधून स्थानिकांना प्रवास करता येत नसल्याने त्या गाडय़ांचा फायदा या मार्गावरील प्रवाशांना होत नाही.

त्यामुळे येथील स्थानिकांना प्रवास करता येईल अशा गाडय़ा रेल्वेकडून सुरू केल्या जाव्यात म्हणून कर्जत प्रवासी संघटनेचे पंकज ओसवाल यांनी पाठपुरावा केला. त्याला रेल्वेने अजब उत्तर दिले आहे. २०११ मध्ये रेल्वेने त्यांना उपनगरीय लोकल या मार्गावर सुरू करता येणार नाही, अशी माहिती लेखी स्वरूपात दिली आहे.

त्यावेळी मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने तेथे दिवा-वसई मार्गावर चालवली जाणारी मेमू गाडी धावू शकते, असे स्पष्ट केले होते. परंतु त्याचवेळी मेमूसाठी दिवा-वसई मार्गावर डबे कमी पडतात. हे डबे ते नव्याने उपलब्ध झाल्यानंतर पनवेल-कर्जत मार्गासाठी मेमू सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती लेखी स्वरूपात दिली होती.

कर्जत-पनवेल दुहेरी रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर तयार करून उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याने रेल्वे प्रशासनाचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे आभार मानत असताना कर्जत-पनवेल या रेल्वे मार्गावर गाडय़ा सुरू कराव्यात, अशी मागणी करून प्रवासी आता थकले आहेत. लोकल गाडय़ांसाठी हा मार्ग योग्य नसेल तर मेमू गाडी उपलब्ध करून फे-या सुरू कराव्यात. कारण कोटय़वधी रुपये खर्च करून त्या मार्गावर प्रवासी गाडय़ा सुरू होणार नसतील तर नवीन मार्ग उभारून काय उपयोग? असा प्रश्न या मार्गावर नियमित गाडय़ा सुरू व्हाव्यात यासाठी प्रयत्न करणारे पंकज ओसवाल यांनी उपस्थित केला आहे.

कर्जत व पनवेल शहराचा भविष्यात होणारा विकास पाहता रेल्वेकडून या विभागाकडे विशेष लक्ष दिले जाते. सात-आठ वर्षापूर्वी १४० कोटी रुपये खर्च करून कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग उभारण्यात आला. मात्र सुरुवातीला मालवाहतूक सुरू झाली, त्यानंतर हळूहळू जलद गाडय़ा सुरू झाल्या. हा मार्ग सुरू झाला तेव्हा कर्जत-पनवेल लोकल सुरू होणार या आनंदात कर्जतकर होते. परंतु त्यांचा पुरता भ्रमनिरास झाला.

हा मार्ग लोकल गाडय़ा चालवण्यासाठी नसल्याने दिवा-वसई मार्गावर सुरू असलेली मेमू गाडी सुरू करण्यात काहीच अडचण नव्हती. परंतु अशी गाडीही सुरू झालेली नाही. काही जलद गाडय़ा सुरू झाल्या त्यापैकी ठरावीक गाडय़ांचा थांबा कर्जतला आहे. त्यासाठीही अर्ज विनंत्या कराव्या लागल्या होत्या. आता या मार्गाचे दुहेरीकरण होणार आहे.

त्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर करून रेल्वे बोर्डाकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करावा, अशी या मार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांनी अपेक्षा आहे. मात्र हा मार्ग करताना त्यावरून लोकल गाडय़ा धावतील, असा करावा म्हणजे मागे केलेली चूक सुधारता येईल. या मार्गावर धावणा-या लांब पल्ल्याच्या सर्व गाडय़ांना जाता-येता कर्जतला थांबा असावा.

मात्र काही कोटी रुपये खर्च करून एखाद् दुसरी मेमू गाडी उपलब्ध करून या मार्गावर जास्तीत जास्त फे-या लवकरात लवकर सुरू कराव्यात. दिवा-वसईकरता दोन गाडय़ा उपलब्ध केल्याचे समजते. तशात गाडय़ा या मार्गासाठी उपलब्ध केल्यास कर्जतकरांची कायमची समस्या मिटेल.

स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांनी या मार्गावर नियमित प्रवासी वाहतुकीची किती आवश्यकता आहे हे रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनात आणावे. म्हणजे हा प्रश्न नक्की मार्गी लागेल. असा विश्वास कर्जत- पनवेल मार्गावर शटल सेवा सुरू करण्याची मागणी पंकज ओसवाल यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *