महाराष्ट्रातील शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या आणि कोकणचे प्रलंबित प्रश्न याबाबत राज्यातील भाजपा-शिवसेना सरकार अन्याय करत असल्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने ९ आणि १० जुलै रोजी राज्यव्यापी निषेध मोर्चाचे आयोजन केले आहे. ९ जुलै रोजी काँग्रेसच्या वतीने माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा नेण्यात येणार आहे.
तर १० जुलै रोजी रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या निषेध मोर्चाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री नारायण राणे व माजी खासदार निलेश राणे करणार आहेत. राज्यात शेतक-यांच्या मोठया प्रमाणावर आत्महत्या होत आहेत.
कोकणातही आंबा बागायतदार शेतक-याने आत्महत्या केली. कोकणातील आंबा उत्पादकांच्या कर्जमाफीचा प्रश्न, मच्छीमारांच्या विविध समस्या, सीआरझेडबाबत कारवाई, लघु आणि मध्यम पाटबंधारे प्रकल्पांसाठी निधीच नाही आदी अनेक प्रश्नांवर कोकणातील जनतेवर अन्याय होत आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हयात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकणातील या दोन्ही जिल्हय़ांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते, शेतकरी आणि सर्वसामान्य जनता मोठया संख्येने सहभागी होऊन राज्यातील भाजपा-सेना युती सरकारचा निषेध नोंदवेल, असे काँग्रेसने स्पष्ट केले.

