बदलापूर येथील बेलवली भागातील ग्रीन लॉन्स या कॉम्प्लेक्समधील उषाबेन जडेजा या महिलेने आपल्या चार वर्षांच्या मुलासह सोमवारी सकाळी १० वाजता इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने परिसर सुन्न झाला असून, उषाबेन यांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला, हे समजू शकलेले नाही.
उषाबेन मुलगा अजय याला क्लाससाठी घेऊन जाते, असे सांगून सकाळी १०च्या सुमारास घराबाहेर पडल्या. मात्र क्लासला न जाता त्या अजयला घेऊन इमारतीच्या सातव्या मजल्यावरील टेरेसवर गेल्या. तेथून त्यांनी अजयसह खाली उडी मारली. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती विजय यांचे भांडुप येथे किराणा मालाचे दुकान आहे. एक महिन्यापूर्वीच जडेजा कुटुंबीय बदलापुरात राहायला आले होते.

