मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळाच्या (व्यापम) परीक्षा व भरती घोटाळ्यातील बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
सोमवारी एका प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असताना आता तिगमगढ जिल्ह्यातील ओरछा गावातला पोलीस हवालदार रमाकांत पांडे याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.
पांडे हे विशेष पर्यटन पोलीस पथकात कार्यरत होते. या घोटाळ्यात जबाब नोंदवणा-या पांडे यांच्या मृत्यूमुळे या घोटाळ्याचे गूढ आणखी वाढले आहे.
दरम्यान व्यापम घोटाळ्याशी संबंधित गेल्या तीन दिवसात तीन लोकांचा मृत्यू झाला असून पांडे यांच्या मृत्यूने व्यापम घोटाळ्याशी संबंध असलेला हा या प्रकरणातला ४५ वा बळी ठरला आहे.
या प्रकरणी काँग्रेसने मुख्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा देण्याची आणि याप्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.

