मुंबईतील एका कंपनीकडून धार्मिक भेदभावामुळे उमेदवाराला नोकरी नाकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. झेशान अली या तरूणाने एमबीएची पदवी घेतली असून त्याने मुंबईस्थित हरीकिशन एक्स्पोटर्स या हिऱ्यांची निर्यात करणाऱ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र, आमच्या इथे मुस्लिमांना नोकरीवर ठेवून घेतले जात नाही, असे सांगत कंपनीकडून झेशानचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आला.
झेशानने त्याच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लगेच ही घटना फेसबुकवर शेअर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सर्वसमावेशक विकासाबद्दल बोलत असतात. मात्र, नोकरी देणाऱ्या कंपन्या असे वर्तन करत आहेत. माझ्याकडे पुरेसे शिक्षण नव्हते तर त्यांनी मला तसे सांगायला हवे होते. मात्र, त्यांच्याकडून नोकरी नाकारण्यासाठी देण्यात आलेले कारण चीड आणणारे असल्याचे झेशानने म्हटले आहे.
यासंदर्भात संबंधित कंपनीशी संपर्क साधला असता त्यांनी झेशानला पाठविण्यात आलेला ई-मेल चुकीने पाठविण्यात आल्याचे सांगितले. ज्या कर्मचाऱ्याकडून हा मेल पाठविण्यात आला होता, तो अजूनही प्रशिक्षण घेत आहे. आम्ही नोकरी देताना कोणताही धार्मिक भेदभाव करत नसल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.
‘मुस्लिम’ असल्यामुळे नोकरी नाकारल्याचा प्रकार मुंबईत उघड

