मध्य प्रदेशात गाजत असलेल्या ‘व्यापम’ घोटाळ्याचा पर्दाफाश करणा-या दोघांचा एका दिवसाआड मृत्यू झाल्याने देशात संतापाची लाट पसरली आहे. ‘आज तक’चे शोध पत्रकार अक्षय सिंग यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार होत असतानाच या गैरव्यवहाराला वाचा फोडणारे जबलपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण शर्मा यांचा दिल्लीतील द्वारका हॉटेलमध्ये गूढ मृत्यू झाला.
या दोघांच्या मृत्यूने देश हादरला असून, या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिपत्याखालील सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी कॉँग्रेसने केली. तसेच विविध राजकीय पक्षांनी हे प्रकरण खोदून काढण्याची जोरदार मागणी केली.
व्यापम घोटाळयात मृत्यू झालेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबाची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर ‘आज तक’चे पत्रकार अक्षय सिंग यांचा शनिवारी गूढ मृत्यू झाला. त्यांच्यावर रविवारी दिल्लीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रवक्ते अजय माकन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया उपस्थित होते.
सिंग यांच्या मृत्यूला २४ तास उलटण्याच्या आधीच जबलपूरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अरुण शर्मा यांचा दिल्लीच्या द्वारका हॉटेलमध्ये रविवारी सकाळी गूढ मृत्यू झाला. शर्मा यांनी महाविद्यालयात झालेल्या प्रवेशात गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणाची चौकशी केली होती. शर्मा यांच्या खोलीत दारूची रिकामी बाटली व उलटी झाल्याचे आढळले.
न्यायवैज्ञक विभागाने येथील पुरावे गोळा केले असून, त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.या दोघांच्या मृत्यूनंतर कॉँग्रेसने अधिक आक्रमक झाली असून तिने या सर्व प्रकरणाची चौकशीची मागणी केली आहे. ‘व्यापम’ हा देशातील मोठा घोटाळा असून आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित ४५ जणांचे मृत्यू झाले आहेत. हे सर्वाचे मृत्यू संशयास्पद आहेत. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी कॉँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक घोटाळे घडूनही मौन बाळगत आहेत. मध्य प्रदेश सरकारने केंद्राकडे सीबीआय चौकशीची मागणी केल्यास त्याची अंमलबजावणी तातडीने होऊ शकते. मध्य प्रदेशातील ‘व्यापम’, छत्तीसगडमधील तांदुळ घोटाळा व राजस्थानमध्ये ललित मोदींना मदत ही सर्व प्रकरणे होऊनही पंतप्रधान एक शब्दही बोलायला तयार नाहीत. याचाच अर्थ पंतप्रधान आपल्या पक्षातील नेत्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या प्रकरणात पत्रकारांचा मृत्यू होत असतानाही ते कारवाई करायला तयार नाहीत, अशी टीका कॉँग्रेसचे प्रवक्ते आर. पी. एन. सिंग यांनी केली. व्यापम घोटाळ्याची चौकशी करणा-या विशेष कृती दलाचा अहवाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाला सादर झाला. त्यानंतर या प्रकरणातील २३ साक्षीदारांचा अनैसर्गिकपणे मृत्यू झाला. त्यात आता आणखी दोघांची भर पडली आहे.
काय आहे व्यापम घोटाळा?
मध्य प्रदेशातील व्यावसायिक परीक्षा मंडळामार्फत (व्यापम) वैद्यकीय व अभियांत्रिकी पूर्व परीक्षा व सरकारी नोकरीच्या परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षेत योग्यता नसलेले अनेक जण उत्तीर्ण झाल्यानंतर या घोटाळ्याचे बिंग फुटले. याचा तपास मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी करत आहे.
‘व्यापम’च्या कृष्णविवरात अनेकांचा बळी
व्यापम हे कृष्णविवर असून त्यात अनेकांचा बळी गेला आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशच्या राज्यपालांना हटवावे, या प्रकरणातील प्रत्येकाच्या मृत्यूची चौकशी करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, अशी मागणी ‘आप’ ने केली.
व्हीसेराची तपासणी ‘एम्स’मध्ये
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली तपास पथक नेमण्याची तयारी दर्शवली आहे. अक्षय सिंग यांचा व्हीसेरा दिल्लीच्या ‘एम्स’ रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यास चौहान यांनी मान्यता दिली आहे.
जेटलींकडून सारवासारव
अक्षय सिंग यांच्या मृत्यूनंतर हे प्रकरण अधिक चिघळले आहे. हे प्रकरण अंगाशी येणार असल्याचे लक्षात आल्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशीची तयारी दर्शवली. यात अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत. त्यामुळे याची सखोल चौकशी झाल्यास अनेकांच्या मनातील संशय दूर होईल, असे जेटलींनी सांगितले.
शर्मा हे दुसरे अधिष्ठाता
व्यापम प्रकरणात गेल्यावर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डी. के. सकल्ले यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रविवारी अधिष्ठाता अरुण शर्मा यांचा मृत्यू झाला. गेल्यावर्षी सकल्ले यांचा घरातच जळलेला मृतदेह आढळला. मध्य प्रदेश पोलिसांनी त्यांनी आत्महत्या केल्याचे जाहीर केले.

