सीमारेषेवर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या कुरापती सुरू झाल्या आहेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे. नियंत्रण रेषेजवळ पूंछ सेक्टरमध्ये शनिवारी (8 जुलै ) सकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. या हल्ल्यात एक जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर सीमेवर सुरू असलेल्या या गोळीबारात जवानाच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या या कुरापतींना भारतीय लष्कर जशास तसे चोख प्रत्युत्तर देत आहे.
शनिवारी सकाळी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केले. पाकिस्ताननं गोळीबार करत निवासी भागांना लक्ष्य केले. गोळीबारात शहीद झालेले जवान सुट्टीनिमित्त घरी आले होते.
तर दुसरीकडे, बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भारतीय लष्करातील सैनिकांवर हल्ला केल्याचेही वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहे. हा हल्ला बांदीपोरामधील हाजिन परिसरात झाला आहे. हल्ल्यानंतर तातडीनं जवानांकडून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, भारतीय सुरक्षा दलानं हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला कंठस्नान घातल्याच्या घटनेला आज (8 जुलै) एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीर खो-यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काश्मीर खो-यात 20 हजारहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत.
शिवाय अमरनाथ यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरुंच्या सुरक्षेसंदर्भातही योग्य ती पाऊले उचलण्यात आली आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फुटरतावादी आणि दहशतवादी संघटनांनी बुरहान वानीच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं खो-यात कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
