रस्तोरस्ती हजारोंच्या संख्येने रोज नमाज पढलेला चालतो… मशिदीवरचे कर्णकर्कश भोंगे चालतात, मग फक्त दहा दिवस साजरा होणार्या गणेशोत्सवासाठी मंडप का चालत नाही, असा रोकडा सवाल बृहन्मुंबई आणि मुंबई उपनगर सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केला आहे. याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी शनिवारी ४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता शिवसेना भवनात महत्त्वाची बैठक होणार असून यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत.
ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर यांनी गणेशोत्सव काळात रस्त्यावर टाकण्यात येणारे मंडप आणि उत्सव काळात होणार्या ध्वनिप्रदूषणाबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर रस्त्यावरून चालणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. रस्ते उत्सव-प्रार्थनेसाठी नाहीत असे सांगत मुंबई उच्च न्यायालयाने रस्त्यावर उत्सवांसाठी मंडप उभारण्यास मनाई केली. याचे तीव्र पडसाद नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये उमटले. प्रत्येक वेळी हिंदूंच्या सणांवरच गदा का, असा सवाल गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांतून विचारला जात आहे.
याप्रकरणी शनिवारी शिवसेना भवन येथे महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबई व उपनगरातील सर्व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सूचनांची नोंद घेऊन गणेशोत्सव मंडळे आणि गणेश भक्तांच्या भावना सरकारला कळविण्यात येतील आणि त्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येईल, अशी माहिती गणेशोत्सव समन्वय समितीने दिली. या बैठकीस मुंबई उपनगर गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष शिवसेना नेते ऍड. लीलाधर डाके, सचिव विनोद घोसाळकर, कार्याध्यक्ष अशोक पटेल तसेच बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर, कार्याध्यक्ष कुंदन आगासकर, सचिव गिरीश वालावलकर, ऍड. मिलिंद परब यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित राहणार आ
हेत. या बैठकीस सर्व मंडळांच्या पदाधिकार्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मशिदींवरचे भोंगे उतरविण्याची हिंमत का नाही?
गल्लोगल्ली मशिदींमध्ये पहाटेपासून दिवसभर मोठ्या आवाजात भोंगे वाजविले जातात. या भोंग्यांमुळे होणार्या ध्वनिप्रदूषणाची दखल घेत हे भोंगे तत्काळ काढून टाकावेत, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र या आदेशांची अंमलबजावणी का होत नाही? हे भोंगे उतरविण्याची कुणाची हिंमत का होत नाही? फक्त गणेशोत्सवाचे मंडप आणि उत्सव काळात वाजविल्या जाणार्या भक्तिपर गाण्यांवरच आक्षेप का घेतला जातो, असा सवाल गणेशोत्सव समन्वय समितीने केला आहे.
शनिवारी शिवसेना भवन येथे बैठक उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

