रायगडच्या रेवदंडा समुद्रकिनारी ब्लू व्हेल आढळल्याची घटना ताजी असतानाच आता नागोठणेमध्ये डॉल्फिन मासा मुक्तपणे जलविहार करताना आढळल्याने लोकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे. डॉल्फिनला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
नागोठणे शहरालगत वाहणाऱ्या अंबा नदीत सकाळी अकाराच्या सुमारास एक डॉल्फिन जलविहार करताना आढळून आला. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली. खाऱ्या पाण्यातील हा मासा चक्क गोड्या पाण्यात आल्याने हा सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला.
खोल समुद्रात आढळणारा हा डॉल्फिन मासा भरकटल्यामुळे धरमतर खाडीतून अंबा नदीत आला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला. आता डॉल्फिनच्या बचावासाठी वन विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, पोलिसांचं पथक दाखल झालं आणि पुन्हा एकदा सुरु झाली माशाच्या बचावाची मोहीम.
काही दिवसांपूर्वीच रायगड जिल्ह्यातील रेवदंडा समुद्रकिनाऱ्यावर ब्ल्यू व्हेल प्रजातीचा 42 फूट लांबीचा महाकाय मासा जखमी अवस्थेत किनाऱ्यावर आला होता. या माशाला पुन्हा एकदा समुद्रात लोटण्यासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र या बचाव मोहिमेदरम्यान ब्ल्यू व्हेल माशाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
आता पुन्हा एकदा रायगड हद्दीत चक्क नदीपात्रात सुमारे साडे चार फूट लांबीचा हा पूर्ण वाढ झालेला डॉल्फिन आढळून आल्याने, जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली.
कुठल्याही परिस्थितीत डॉल्फिन माशाला सुखरपप समुद्रात सोडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मात्र डॉल्फिनला पकडायचं तरी कसं आणि का, हा कळीचा मुद्दा होता. रात्री उशिरापर्यंत माशाला पकडण्याचे प्रयत्न सुरु होते. परंतु अद्याप त्याला यश आलेलं नाही.

