लेटकमर्स’ वधू-वरांना 5 हजारांचा दंड, नागपुरातील सिंधी पंचायतीचा फतवा

लेटकमर्स’ वधू-वरांना 5 हजारांचा दंड, नागपुरातील सिंधी पंचायतीचा फतवा

लग्न समारंभात उशिरा पोहोचणाऱ्या नवरदेव आणि नववधूला यापुढे दंड भरावा लागणार आहे. नागपुरातील सिंधी पंचायतीने हा फतवा काढला आहे. लग्नाच्या दिवशी नवरदेव वरात घेऊन उशिरा पोहोचतात, तर अनेकदा ब्युटीपार्लरला गेलेली नववधूही उशिरा स्टेजवर पोहोचते. त्यामुळे लग्नात आलेल्यांना त्यांची वाट पाहत बसावे लागते. त्यामुळे सिंधी पंचायतीने हा निर्णय घेतला आहे.

मात्र, अशा ‘लेटकमर्स’ नवरदेव आणि नववधुंना यापुढे 5 हजार रुपयांचा दंड सिंधी पंचायतीसमोर भरावा लागणार आहे. शिवाय महिला आणि मुलीनी लग्न वरातीत नृत्य करू नये, नृत्य करायचेच असल्यास मंगल कार्यालयाच्या आत फक्त 5 मिनिटं नृत्य करावं. तेही फक्त कुटुंबीयांसमोर, असा निर्णय ही सिंधी समाजाच्या पंचायतीने घेतला आहे.

नुकतंच सिंधी समाजाची एक पंचायत भोपाळ येथे पार पडली. त्यात हे निर्णय घेण्यात आले असून नागपूरच्या सिंधी पंचायतने सुद्धा त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्णय घेतले आहे. त्यामध्ये महिला आणि मुलींवर सार्वजनिकरित्या लग्न समारंभात आणि वरातीत नृत्य करण्यावर बंधने लादली आहेत. शिवाय समाजात कोणाचाही मृत्यू झाल्यास तेराव्या वर किंवा इतर विधींमध्ये जेवणावळी ठेऊ नये असे ही ठरवण्यात आले आहे.

भोपाळमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी सर्वच शहरात व्हावी असे अपेक्षित होते. त्यानुसारच नागपूर सिंधी पंचायतनेही भोपाळ पंचायतीने घेतलेल्या निर्णयांना पाठींबा दर्शवत नागपुरात त्यांची अंमलबजावणी सुरु करण्याचे ठरवल्याची माहिती सिंधी समाजाचे नेते वेदप्रकाश आर्य यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *