नवी मुंबईतून सात वर्षीय मुलगी बेपत्ता

ऐरोली सेक्टर ८ मध्ये राहणारी सात वर्षीय फ्रेंनशिला सोफिया फ्रान्सिस वाज ही सात वर्षीय मुलगी सोमवारी संध्याकाळी अचानक बेपत्ता झाली. ही मुलगी स्कूल बसमधून इमारतीच्या गेटवर उतरली खरी. पण त्यानंतर ती एका लाल कारमधून गायब झालीय.

त्यामुळे संपूर्ण नवी मुंबईत खळबळ माजलीय. नवी मुंबईच्या ऐरोली भागातले नागरिक सध्या प्रचंड भयभीत झालेत. न्यू होरायझन पब्लिक स्कूलच्या पहिल्या इयत्तेत शिकणारी फ्रेनशीला सोफिया फ्रान्सिस वाज नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर स्कूलबसमधून आली. आपल्या इमारतीपाशी ती उतरली पण घरी मात्र गेली नाही.

सोबत तिच्याच शाळेत शिकणारा एक विद्यार्थीही उतरला त्याने नेहमीप्रमाणे तिला बाय बाय केलं. पण फ्रेनशिला मात्र घरात पोहोचली नाही. दहा मिनिटं झाली तरी ती घरी न आल्याने तिची आई तिला पाहायला खाली गेली तेव्हा फ्रेनशीला एका लाल रंगाच्या कारमधून एका इसमासोबत गेल्याचं तिला कळलं.

पोलिसांनी कसून तपासाला सुरूवात केलीय. मुलीच्या शोधासाठी ११ टीम तयार करण्यात आल्या आहेत. फ्रेनशीलाचे वडील परदेशात कामाला आहेत. फ्रेंनशिला नक्की कुठे गेली, कोणासोबत गेली, त्या लाल कारमध्ये नक्की कोण होतं याची उत्तरं मिळालेली नाहीत. त्यामुळे ऐरोली परिसरात मोठं तणावाचं वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *