टोलच्या कटकटीतून नागरिकांना काहीसा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी वर्षाला एकदाच पैसे भरुन नंतर देशातल्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवरचा प्रवास मोफत करु द्यायचा अशी एक योजना पुढे येते आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयासमोर अशा प्रकारचा प्रस्ताव आला आहे. त्यासाठी वर्षाला साधारण अडीच हजार किंवा तीन हजार रुपये नागरिकांना भरावे लागणार आहेत. या पैशांमध्ये ते देशभरात टोल फ्री प्रवास करु शकतील. टोलचा वार्षिक पास असं काहीतरी या योजनेचं स्वरुप असेल.
सध्या जे पास आहेत ते फक्त एकाच टोलनाक्यासाठी उपलब्ध असतात, मात्र हा पास सर्व राष्ट्रीय महामार्गांवर चालू शकणारा असेल. त्यामुळे आता या प्रस्तावावर सरकार पुढे काय भूमिका घेतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल. महाराष्ट्रात टोलमुक्तीचं स्वप्न दाखवत भाजप नेत्यांनी प्रचारात जोरदार राळ उठवली होती. मात्र, अजूनही राज्यात ते करुन दाखवणं त्यांना शक्य झालेलं नाही. आता केंद्रानं अशी प्रकारची योजना लागू केल्यास त्यामुळे काही अंशी दिलासा नागरिकांना मिळू शकतो.

