महिला व बालविकास विभागातील २०६ कोटी रुपयांच्या खरेदीतील भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मंगळवारी वरळी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुख्यालयात वरिष्ठ अधिका-यांची भेट घेऊन सादर केले.
हा गैरव्यवहार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे इतर प्रकरणांप्रमाणेच या खरेदीचीही खुली चौकशी करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा सातत्याने या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत आहे. या खरेदीतील गैरव्यवहाराचे सर्व पुरावे मंत्रालयातच उपलब्ध असताना मुख्यमंत्री हेतुपुरस्सर विरोधकांकडेच पुरावे मागत आहेत.
मंत्रालयात झालेल्या गैरव्यवहाराचे पुरावे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांकडे मागावे हे अत्यंत हास्यास्पद आहे. मात्र त्यांच्या इच्छेनुसार आम्ही पुरावे सादर केले आहेत. आता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, तसेच निष्पक्ष चौकशीसाठी पंकजा मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असे सावंत यांनी सांगितले.
पंकजा मुंडे यांच्यावर आणखी एक आरोप
जालना जिल्ह्यातील चेकडॅमची कामे रत्नाकर गुट्टे यांना थेट दिल्याचा आरोप झाल्याने जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत.
रत्नाकर गुट्टे यांची कंपनी तांत्रिक मुद्दयावर अपात्र ठरली असूनही कंपनीला हे कंत्राट दिले गेले. रत्नाकर गुट्टे हे पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळी तालुक्यातील रहिवासी आहेत.
पंकजा मुंडे यांनी या आरोपाला आपल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्या म्हणाल्या की, रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. त्यांना कंत्राट देण्याबाबत आपण कोणताही हस्तक्षेप केलेला नाही.

