लाल मिरच्यांच्या दरात किलोमागे २० ते १०० रुपयांची वाढ

लाल मिरच्यांच्या दरात किलोमागे २० ते १०० रुपयांची वाढ

वर्षभर घरात लागणाऱ्या तिखटाची बेगमी म्हणून दर वर्षी उन्हाळय़ाच्या हंगामात तयार करण्यात येणाऱ्या मसाल्याला यंदा महागाईमुळे चांगलाच झणका लागण्याची चिन्हे आहेत. मसाल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिरचीचे दर गतवर्षीच्या तुलनेत किलोमागे ३० ते ४० रुपयांनी वाढल्यामुळे वर्षभराचा मसाला बनवणाऱ्या गृहिणी हैराण झाल्या आहेत. त्यातल्या त्यात गरम मसाल्याच्या जिनसांचे दर यंदा कायम असल्याने त्याबाबत थोडा दिलासा मिळाला आहे.

उन्हाळा आला की गृहिणी वर्षभर पुरेल इतका मसाला बनवण्याच्या कामाला लागतात. हल्ली बाजारात सर्व वस्तू आयत्या मिळत असल्या तरी अनेक घरांत आजही कुटुंबाच्या पारंपरिक पद्धतीनुसार मसाला तयार करण्यात येतो. या काळात मिरच्यांची मागणी वाढत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज १७ ते १८ गाडय़ा भरून सुक्या मिरच्या दाखल होत असतात. परंतु, यंदा घाऊक बाजारातील उत्तम मिरचीचे दर २०० ते ३०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. गत वर्षी हेच दर १५० ते २०० रुपयांच्या आसपास होते. सर्वच प्रकारच्या मिरच्यांच्या दरात किलोमागे ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे, अशी माहिती रमेश विकमाने या विक्रेत्याने दिली. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच पांडी व लवंगी मिरचीचे दर हे वाढण्याऐवजी घसरले आहेत. या मिरच्यांचे उत्पादन यंदा जास्त असल्याने दर घसरल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण हंगामात सुमारे दहा लाखांच्या आसपास पोती बाजारात येते. कर्नाटकमधून बेडगी,काश्मिरी, आंध्र प्रदेश मधून रेशमपट्टी, पांडी, बेडगी, लवंगी, मध्य प्रदेशातून गुंटूर आणि महाराष्ट्रातून पांडी मिरच्या येतात. महाराष्ट्रीय नागरिक जास्त प्रमाणात बेडगी, काश्मिरी, संकेश्वरी आणि पांडी या मिरच्यांचा वापर मसाल्यात करतात. पांडी मिरची ही मसाल्याला तिखटपणा येण्यासाठी वापरतात तर संकेश्वरी मिरचीमुळे तिखटपणा व रंगही मसाल्याला येतो. काश्मिरी व बेडगी मिरची ही रंगास गडद, चवदार, दीर्घकाळ रंग टिकणारी व कमी तिखट असते. रेशमपट्टी मिरचीला गुजराती नागरिकांची जास्त मागणी असते. ती कमी तिखट असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *