अमेरिकेतील जॉर्जिया या राज्याच्या सरकारने तेथील एका दाम्पत्यास त्यांच्या मुलीचे नाव ‘अल्ला’ असे ठेवण्यास मज्जाव केल्यावरून मानवी हक्क संघटनेने राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला आहे.
एलिझाबेथ हॅण्डी आणि बिलाल वॉक या जोडप्याला २२ महिन्यांची एक मुलगी असून तिचे नाव झलिखा ग्रेसफूल लॉरियाना अल्ला असे ठेवावे, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र जॉर्जिया राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने त्यांना मुलीचे शेवटचे नाव अल्ला असे ठेवू देण्यास नकार दिल्याचे वृत्त ‘अॅटलांचा जर्नल कॉन्स्टिट्यूशन’ या वृत्तपत्राने दिले. राज्याच्या कायद्यानुसार मुलांना आई किंवा वडील यांचेच नाव लावता येते. त्यामुळे या दाम्पत्याने त्यांच्या मुलीचे शेवटचे नाव हॅण्डी किंवा वॉक अथवा ही दोन्ही नावे एकत्र करून ठेवावे, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.
हा सरळसरळ अन्याय आहे व आमच्या हक्कांची पायमल्ली आहे, असे वॉक म्हणाले. मात्र याविरुद्ध या दम्पतीने कोणतेही पाऊल उचलले नसले तरी अमेरिकन सिव्हिल राइट््स युनियनच्या जॉर्जिया शाखेने राज्य सरकारविरुद्ध न्यायालयात दिवाणी दाखल केला आहे. संघटनेच्या राज्य शाखेच्या कार्यकारी संचालिका अॅन्ड्रिया यंग म्हणाल्या की, पालकांनी त्यांच्या मुलांची नावे कोणती ठेवावीत व कोणती ठेवू नयेत हे सांगण्याशी सरकारचा काहीही संबंध येत नाही.
सरकारची ही भूमिका पालकांच्या त्यांच्या मुलांचे संगोपन करण्याच्या हक्कात हस्तक्षेप करणारी आहे.
‘अल्ला’ हे नाव खानदानी असल्याने आम्ही ते निवडले आहे व त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही, असे हँडी व वॉक यांचे म्हणणे आहे.
सरकारच्या या नकारामुळे आम्हाला मुलीचा जन्मदाखला मिळू शकत नाही. तो नसेल तर तिला सामाजिक सुरक्षा योजनेचा क्रमांक मिळणार नाही, शाळेत प्रवेश मिळणार नाही, तसेच प्रवास करतानाही अडचणी येतील.