राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेतून बलात्कार पीडित महिला व मुलींना पुनर्वसनासाठी राज्य सरकरकडून १० लाखांची मदत देणार असल्याचे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेवर बोलताना दिले.
विधान परिषदेच्या सदस्या हुसनबानू खलीफे यांच्यासह इतर सदस्यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली होती. २०१३ पासून राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेतून बलात्कार पीडित महिलांना शासनाकडून ३ लाख आर्थिक मदत दिली जात आहे. मात्र ही मदत तुटपुंजी असल्याने एका प्रकरणात पीडित मुलीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यामध्ये गोव्यात बलात्कार पीडित महिला आणि मुलींना १० लाखांची मदत केली जात असल्याचा संदर्भ दिला. त्यानुसार राज्यातही पीडित महिलांना मदत देण्यात यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सदस्यांच्या मागणीनंतर अखेर मुंडे यांनी या विषयावर शासन गंभीर असून मदत वाढवण्यासाठी सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले.