तामिळनाडू सरकारच्या जलीकट्टू विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी

गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टूला परवानगी देण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. कारण यासंदर्भातील विधेयकाला राष्ट्रपतींनीही मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांनी दिली आहे. तसेच या खेळाच्या आयोजनासाठी पंतप्रधान मोदींनी समर्थन दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचेही आभार मानले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, जलीकट्टूच्या आयोजनासाठी राज्य सरकारने विधानसभेत विधेयक मांडले होतं. हे विधेयक विधानसभा सदस्यांच्या मंजुरीनंतर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी राष्ट्रपतींकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवलं होतं. याला राष्ट्रपतींनी 31 जानेवारी 2017 रोजी मंजुरी दिली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आभार मानले असून, या पत्रात, जलीकट्टूच्या आयोजनासाठी समर्थन दिल्याबद्दल तामिळनाडू सरकार आणि जनतेच्यावतीने आभार मानले आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातही जलीकट्टूप्रमाणे बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळावी ही मागणी जोर धरत आहे. यासाठी बैलगाडा संघटनांच्या प्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांची भेट घेऊन अध्यादेशाची मागणी केली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनीही अनुकूलता दाखवली असून, राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर आध्यादेश काढू, असे आश्वासन त्यांनी बैलगाडी संघटनेच्या प्रतिनिधींना दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *