दिव्यातील प्रवासी राहिले फलाटावरच!

सोमवारी सकाळी दिवा स्थानकात पहिली जलद लोकल दाखल झाली… फलाटावर खच्चून गर्दी जमली होती… मात्र, जलद लोकलला अगोदरच प्रवासी लटकून आले होते… त्यामुळे आतील प्रवासी आणि फलाटावरील ‘दिवेकर’ यांच्यात फ्रीस्टाइल पहिल्याच दिवशी झाली… या अग्निदिव्यातून हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्याच दिवेकरांना जलद लोकलला कसेबसे लटकता आले… फलाटावर उरलेल्या बहुतांश प्रवाशांनी जलद लोकलकरिता आणखी तासभर प्रतीक्षा करण्याऐवजी धीम्या मार्गावरून कार्यालयाचा मार्ग धरला.

रविवारी अप-डाउन दिशांच्या २४ जलद लोकलना वाजतगाजत थांबा देण्यात आला. प्रवाशांसह लोकप्रतिनिधींनी जल्लोष करीत या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र, सोमवारी प्रत्यक्ष गर्दीच्या वेळेत लोकल प्रवासाचा क्षण उगवला, तेव्हा प्रवेश न मिळाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली.

सकाळी ६.५५ ला लोकल पकडण्यासाठी प्रवाशांनी नव्या फलाट क्रमांक ४ वर एकच गर्दी केली, पण अगोदरच उशीर झालेली ही लोकल या स्थानकात येण्याआधीच खचाखच भरून आली. डोंबिवलीकरांचा लोंढा त्या गाडीत चढला आणि ठाणे रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांनी समोरच्या दरवाजात गर्दी केली होती. लोकल दिवा स्थानकात आली तेव्हा ठाण्यात उतरण्याकरिता तयारीत असलेले प्रवासी दरवाजात लटकले होते व डोंबिवलीकर आतील सीटकडे सरकण्याच्या खटपटीत होते. त्यामुळे जलद लोकल पकडण्याकरिता उत्साहाने आलेल्या दिव्यातील प्रवाशांना झटापट करावी लागली. ठाण्याला उतरणाऱ्या प्रवाशांना दिव्यातील हे प्रवासी आत आले, तर आपल्याला ठाण्यात उतरणे कठीण होईल, अशी भीती वाटत असल्याने त्यांनी कडेकोट बंदोबस्त लावून दिव्यातील प्रवाशांना डब्यात येण्यापासून रोखले. फलाटावर जमलेल्या शेकडो प्रवाशांपैकी जेमतेम दहा-वीस प्रवाशांना कसेबसे दरवाजात लटकता आले. महिलांच्या डब्यात तर दिव्यातील महिलांना प्रवेशबंदीच केली गेली. आम्हाला ठाण्यात उतरायचे आहे, असे बजावत दरवाजातील रणरागिणींनी निकराने दरवाजा लढवला. त्यामुळे दिव्यातील महिलांची घोर निराशा झाली.

जलद लोकल फलाटावरून हलल्यावर इंडिकेटरवर पुढील लोकल लागली, ती तासाभरानंतरची. त्यामुळे लागलीच प्रवाशांनी ट्रॅकमध्ये उड्या ठोकत धीम्या मार्गावरील गाडीकरिता गर्दी केली. गर्दीच्या वेळेला जलद लोकलचा काहीच फायदा नाही, असा सूर लागलीच दिव्यातील प्रवाशांनी आळवण्यास सुरुवात केली. कल्याण-डोंबिवलीतील रेल्वे प्रवाशांना सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळेत जशा १० ते १५ मिनिटांच्या अंतराने जलद लोकल आहेत, तशा दिवा स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या मिळाव्यात, अशी मूळ मागणी जोर धरत आहे. दिवा लोकल सुरू झाली तर फायदा मिळेल, अन्यथा केवळ जलद लोकल थांबतात, यावरच समाधान मानून गप्प बसावे लागेल, असे दिव्यातील प्रवासी बोलू लागले आहेत.

गेली अनेक वर्षे या स्थानकाला जंक्शनचा दर्जा आहे, मात्र ना येथे मुख्य मार्गावरील लांबपल्ल्यांच्या गाड्या थांबतात, ना एवढी वर्षे जलद लोकल थांबतात. कोकण रेल्वेच्याही असंख्य लांबपल्ल्यांच्या गाड्यांपैकी केवळ दादर-रत्नागिरी या पॅसेंजर गाडीलाच दिवा स्थानकात थांबा आहे, ही उपेक्षा नाही तर काय, अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *