पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बँकांमध्ये 10 ते 14 नोव्हेंबर या अवघ्या चार दिवसात 5 हजार कोटी रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. ही सर्व रक्कम चलनातून रद्द करण्यात आलेल्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या जुन्या नोटांच्या स्वरुपातील आहे. त्यावेळी जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली होती.
जिल्हा बँकांमध्ये बहुतांश खातीही शेतक-यांची असतात. नाबार्ड ही जिल्हा बँकांची प्रमुख बँक असून नाबार्डने संशयास्पद व्यवहार शोधण्यासाठी काही खात्यांचा तपास सुरु केला आहे. काही खात्यांचा बेहिशोबी रक्कम जमा करण्यासाठी वापर करण्यात आला अशी तक्रार आल्याचे अधिका-यांनी सांगितले. राज्यातील 31 जिल्हा सहकारी बँकांवर स्थानिक राजकरण्यांचे वर्चस्व आहे.
जिल्हा सहकारी बँकांना फक्त चारच दिवस रद्द झालेल्या जुन्या नोटा स्वीकारता आल्या. या दरम्यान 3800 पेक्षा जास्त शाखांमध्ये मोठया प्रमाणावर रक्कम जमा करण्यात आली. 15 नोव्हेंबरपासून आरबीआयने जिल्हा बँकांमध्ये रक्कम डिपॉझिट करण्यावर किंवा नोटा बदलून देण्यावर बंदी घातली. खातेदाराला जिल्हा बँकांमधून अन्य बँकांप्रमाणे आठवडयाला फक्त 24 हजार रुपये काढण्याची परवानगी आहे.
